मराठी सिनेसृष्टीत सध्या अनेक ऐतिहासिक चित्रपट काढण्यात येत आहेत. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिखस्त’, ‘हिरकणी’नंतर आता ‘पावनखिंड’ हा चित्रपट सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहेत. त्यानंतर आता आणखी एक ऐतिहासिक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) असे या चित्रपटाचे नाव असून याद्वारे प्रेक्षकांना महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास पुन्हा एकदा पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
झी स्टुडिओज आणि गणेश मार्केंटिंग फिल्म्सद्वारा या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. नुकतीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. विशेष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी या टीझरला आवाज दिला आहे. झी स्टुडिओजच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर हा टीझर शेअर करण्यात आलेला आहे.
‘जेव्हा मायमाऊलीची बेअब्रू, आणि मंदिरांना तडा गुन्हा नव्हता… जेव्हा सह्याद्रीला कडा आणि मराठीला बाणा नव्हता… ही ३५० वर्षांनंतरच्य पहाटफुटीची गोष्ट आहे… ही अठरापगड आरोळ्यांची आणि आपल्या छत्रपतींच्या शिवगर्जनेची गोष्ट आहे..’, असा राज ठाकरेंचा दमदार आवाज या टीझरमध्ये ऐकायला मिळत आहे.
टीझर शेअर करत लिहिण्यात आले की, ‘ही ३५० वर्षांनंतरच्या पहाटफुटीची गोष्ट आहे. ही अठरापगड आरोळ्यांची आणि आपल्या छत्रपतींच्या शिवगर्जनेची गोष्ट आहे. यंदाच्या दिवाळीत झी स्टुडिओज घेऊन येत आहे मराठी माणसाच्या ह्रदयात वसलेली, महाराष्ट्राच्या बुलंद आवाजातली स्वराज्याची सुवर्णगाथा’.
‘हर हर महादेव’ या शिवगर्जनेने प्रत्येकाच्या अंगावर शहारा आल्याशिवाय राहत नाही. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यातून, सिंधुदुर्गाच्या लाटांमधून, देवगिरीच्या अभेद्य भिंतीमधून ते अटकेपार फडकावणाऱ्या भगव्या ध्वजापर्यंत जिथे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याची मोहोर उमटली तिथे तिथे या गर्जनेने आसमंत दणाणून सोडला. या गर्जनेशिवाय मराठ्यांचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही.
दरम्यान, ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन अभिजीत देशपांडे यांच्याद्वारे करण्यात येत आहे. यंदाच्या दिवाळीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टीझरला प्रेक्षकांची खूप पसंती मिळत असून टीझरने चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
मुलासोबत शाहरूखला चित्रपटात करायचे आहे काम पण येतोय ‘हा’ मोठा अडथळा
राणी मुखर्जीपासून ते जॉन अब्राहमपर्यंत, ‘हे’ आहेत बॉलिवूडचे कंजूस अभिनेते, वाचा यामागची कारणं
घरात बहिणीचा मृतदेह पडलेला असताना स्टेजवर परफॉर्म करायला पोहोचले होते जॉनी लिव्हर, म्हणाले, त्या दिवशी..