raj thackeray : सत्तांतरानंतरचा पहिलाच म्हणजे यंदाचा दसरा मेळावा चांगलाच चर्चेत आला आहे. अशातच न्यायालयाने ठाकरे गटाच्या बाजूने निर्णय दिला आहे. यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचाच आवाज घुमनार आहे. तर दुसरीकडे शिंदे गटात नाराजी पसरली आहे.
गेल्या दोन आठवड्यापासून दसरा मेळाव्यावरून राजकारण ढवळून निघालं आहे. अशातच मनसेच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी दसरा मेळाव्यावरून मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटले आहे.
माध्यमांशी बोलताना प्रकाश महाजन यांनी म्हंटलं आहे की, दसरा मेळाव्याबाबत राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक सल्ला दिला होता. दसरा मेळावा आणि शिवसेना हे एक समीकरण असून, त्यात आपण पडू नयेत असा सल्ला राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिला होता, असं महाजन यांनी सांगितलं.
पुढे बोलताना महाजन म्हणाले, ‘आमच्या पक्षातील सुद्धा तरुण कार्यकर्त्यांचं म्हणतं होतं की, राज ठाकरेंनी सुद्धा दसरा मेळावा घ्यावा. मात्र त्यावर राज ठाकरे म्हणाले होते की, वर्षोनुवर्षे दसरा मेळावा म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी पार्क हे समीकरण आहे. त्यामुळे यात आपण जाणे हे योग्य ठरणार नाही.’
दरम्यान, शिंदे गटाने देखील मेळाव्यासाठी रणनीती बनवायला सुरुवात केली आहे. दसरा मेळाव्यासाठी रणनीती कशी बनवायची? याबाबत सध्या शिंदे गटात चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आमदारांची बैठक बोलावली आहे.
शिंदे गटातील आमदार सुहास कांदे यांनी सांगितलं आहे की, ‘दरवर्षी शिवतीर्थावर गर्दी एकनाथ शिंदेंनी जमवली होती. आता तीच तयारी बीकेसी ग्राऊंडवर होणार आहे. नेहमीप्रमाणे तयारी सुरू आहे.’ दरवर्षी शिवाजी पार्कवर गर्दी जमवण्याचं काम शिंदेंकडे असायचं आम्हाला बीकेसीत गर्दी जमवणं काही अवघड नाही,’ असं कांदे म्हणाले.