Share

आगामी निवडणुकांसाठी दृष्टीने राज ठाकरे ऍक्टिव्ह; नाराज वसंत मोरेंना दिली ‘ही’ मोठी जबाबदारी

आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आता सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. त्यात मनसेने देखील आपली तयारी सुरू केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या नेते, सरचिटणीस यांची नुकतीच एक महत्वपुर्ण बैठक घेतल्याचं समोर आलं आहे.

माहितीनुसार, या बैठकीनंतर मनसेनं विविध लोकसभा मतदारसंघनिहाय निरीक्षक नेमले आहेत. त्यात पुणे ग्रामीण भागातील शिरूर, मावळ आणि बारामती लोकसभेसाठी पक्षाने पुण्यातील नेत्यांना जबाबदारी दिली आहे. यासंदर्भातील पत्रक देखील राज ठाकरे यांच्या सहीनं जारी करण्यात आलं आहे.

त्या पत्रकात नमूद केल्यानुसार, मावळ लोकसभा मतदारसंघातील निरीक्षक म्हणून किशोर शिंदे, गणेश सातपुते, हेमंत संभूस यांची निवड करण्यात आली आहे. तर शिरूर मतदारसंघात बाळा शेडगे आणि अजय शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.

तसेच बारामती लोकसभा मतदारसंघात वसंत मोरे, रणजित शिरोळे, सुधीर पाटसकर यांना निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. मनसे अधिकृत या ट्विट हँडलवरून हे पत्रक जाहीर करण्यात आलं आहे. यामध्ये सर्व माहिती नमूद करण्यात आली आहे.

या यादीत असणारे वसंत मोरे यांच्या नावाची सध्या चर्चा आहे, कारण, मध्यंतरीच्या काळात वसंत मोरे यांना पक्षाने पुणे शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. मात्र जेव्हा राज ठाकरेंनी प्रखर हिंदुत्वाचा मुद्दा मांडत मशिदीवरील भोंगे हटवण्याचं आंदोलन हाती घेतलं, त्यावर मोरेंनी नाराजी व्यक्त केली त्यामुळे त्यांचं शहराध्यक्षपद काढून घेण्यात आलं.

त्यानंतर, पुणे शहराध्यक्ष पदी मोरेंच्या जागी साईनाथ बाबर यांना जागा दिली. या प्रकरणानंतर वसंत मोरे नाराज असल्याचं बोललं जायचं. मात्र, एवढं होऊन देखील वसंत मोरे यांनी मनसेची साथ सोडली नाही. वसंत मोरे राज ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले. अखेर आता राज ठाकरेंनी त्यांची बारामती लोकसभा मतदारसंघात निरीक्षक म्हणून निवड केल्याने चर्चेला उधाण आले आहे.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now