Rahul Gandhi: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर (Election Commission) थेट हल्लाबोल केला आहे. सलग नऊ दिवसांत दुसऱ्यांदा त्यांनी आयोगातील अधिकाऱ्यांना तीव्र शब्दांत इशारा दिला. शुक्रवारी संसद भवनाबाहेर माध्यमांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले, “निवडणूक आयोग भाजपासाठी (BJP) मते चोरण्याचे काम करत आहे. आमच्याकडे याचे शंभर टक्के पुरावे आहेत. हा प्रकार देशाविरुद्ध आहे, म्हणजेच देशद्रोह आहे. तुम्ही निवृत्त झाला तरी आम्ही तुम्हाला शोधून काढू. तुम्ही कुठेही लपून बसलात तरी आम्ही सोडणार नाही.”
अणुबॉम्बच्या स्फोटाचा इशारा
राहुल गांधी यांनी पुढे स्पष्ट केले की, “आमच्याकडे निवडणूक आयोगाच्या गैरप्रकारांचे इतके पक्के पुरावे आहेत की, एकदा हे जाहीर केले की संपूर्ण देश हादरेल. आम्ही जेव्हा ‘अणुबॉम्ब’ फोडू, तेव्हा हा आयोग टिकणार नाही.” यापूर्वी 24 जुलै रोजीही राहुल गांधी यांनी आयोगाला उद्देशून इशारा दिला होता की, “तुम्हाला वाटत असेल की तुम्ही यातून सुटाल, तर तो तुमचा मोठा गैरसमज आहे.”
निवडणूक आयोगाची प्रतिक्रिया
राहुल गांधी यांच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने मात्र सपाट उत्तर दिलं. आयोगाने म्हटलं, “हे आरोप निराधार आहेत. आम्ही अशा बेजबाबदार विधानांकडे दुर्लक्ष करतो. आमचे सर्व अधिकारी पारदर्शक आणि निष्पक्षपणे काम करतील, याबाबत आम्ही कटिबद्ध आहोत. धमक्यांना आम्ही घाबरणार नाही.”
गैरप्रकारांचे दावे
राहुल गांधी म्हणाले की, “मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि लोकसभा निवडणुकीत आमच्या शंका अधिक वाढल्या. कर्नाटकमधील एका मतदारसंघात झालेला प्रकार तर धक्कादायक आहे. तिथे 50, 60, 65 वर्षांच्या हजारो नव्या मतदारांना यादीत सामाविष्ट केले, तर 18 वर्षांवरील मतदारांना वगळले. फक्त एका जागेची चौकशी केली असता हे उघड झालं, मग इतर ठिकाणी काय चाललं असेल, याची कल्पना करा.”
बिहारमध्ये सध्या मतदार पडताळणी प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत विरोधक रस्त्यावर उतरले आहेत. संसदेत आणि संसदबाहेरही निषेध सुरू आहे. दरम्यान, बिहारमध्ये आयोगाने शुक्रवारी नवी मतदार यादीचा मसुदा जारी केला आहे. परंतु राहुल गांधींसह संपूर्ण विरोधी पक्षाने हा प्रकार निवडणुकीपूर्वीचा मोठा गैरप्रकार असल्याचा दावा केला आहे.