बॉलिवूड अभिनेता आर माधवनचा (R. Madhavan) मुलगा वेदांतने नुकतीच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव रोशन केले होते. त्याने डॅनिश ओपन स्विमिंग स्पर्धेत शनिवारी रौप्य पदक जिंकत भारताला गौरव मिळवून दिले होते. वेदांतच्या या कामगिरीसाठी त्याच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. त्यानंतर आता वेदांतने आणखी एक विक्रम करत पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचावली आहे.
वेदांतने डॅनिश ओपन २०२२ च्या ८०० मीटर पोहण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवला आहे. त्याने या स्पर्धेत ८:१७.२८ एवढा वेळ घेऊन प्रथम येत सुवर्ण पदक पटकावला आहे. तर मुलाच्या या कामगिरीबाबत आर माधवनने सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे. तसेच मुलाला सन्मान करण्यादरम्यानचा एक व्हिडिओ त्याने शेअर केला आहे.
माधवनने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये सन्मान सोहळ्यादरम्यान वेदांतच्या नावाची घोषणा करताना दिसून येत आहे. तसेच वेदांतला सुवर्ण पदक देऊन त्याचा सन्मान करताना या व्हिडिओत दिसून येत आहे. व्हिडिओ शेअर करत माधवनने लिहिले की, ‘सुवर्ण… तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि देवाच्या कृपेने विजयाचा मार्ग सुरु आहे’.
माधवनने पुढे लिहिले की, ‘आज वेदांत माधवनला ८०० मीटरच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळाला आहे. या विजयाने मी भारावून गेलो आहे आणि कृतज्ञ आहे. कोच प्रदीप सर, स्विमिंग फेडरेशन आणि संपूर्ण टीमचे धन्यवाद’. माधवनच्या या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेकजण कमेंट करत वेदांतचे कौतुक करत त्याला शुभेच्छा देत आहेत.
यापूर्वी वेदांतने वेगळ्या कॅटेगिरीच्या जलतरण स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. त्याने पुरुषांच्या १५०० मीटर फ्रीस्टाईल या स्पर्धेत हा पदक मिळवला होता. ही आनंदाची बातमी शेअर करताना माधवनने लिहिले होते की, ‘तुम्हा सर्वांच्या आशीर्वाद आणि देवाच्या कृपेने साजन प्रकाश आणि वेदांत माधवनने कोपेनहेगनमध्ये द डॅनिश ओपनमध्ये भारतासाठी क्रमशः सुवर्ण आणि सिल्व्हर पदक मिळवले आहे. आम्हाला खूप अभिमान वाटत आहे’.
दरम्यान, वेदांतने यापूर्वी अनेक आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सहभाग नोंदवून भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच त्याने अनेक देशांतर्गत स्पर्धेतही भाग घेऊन वेगवेगळ्या श्रेणीत कांस्यपासून ते सुवर्ण पदकापर्यंत पुरस्कार मिळवले आहेत. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये नॅशनल अॅक्वाटिक चॅम्पियनशीपमध्ये महाराष्ट्रासाठी वेदांतने सात पदक जिंकले होते. यामध्ये चार रौप्य आणि तीन कांस्य पदकांचा समावेश होता.
महत्त्वाच्या बातम्या :
आलिया-रणबीरच्या मेहंदीच्या वेळी करण जोहरसोबत घडला होता मजेशीर प्रकार, वाचून पोट धरून हसाल
मौनी रॉय आणि सूरज नांबियारच्या नात्यात दुरावा? ‘त्या’ एका पोस्टमुळे चर्चांना उधाण
लग्नाच्या काही दिवसातच प्रसिद्ध अभिनेत्रीवर रडण्याची वेळ, पोस्ट करत म्हणाली, लवकर ये..