सरकारी टेलिकॉम कंपनी असलेल्या BSNLचं पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्र सरकारनं तब्बल १.६४ लाख कोटींच पॅकेज दिलं आहे. मात्र, कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आवश्यक ती मेहनत न केल्याचे समोर आल्याने, केंद्रीय टेलिकॉम मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आता बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे.
केंद्र सरकारने, BSNLचं पुनरुज्जीवन करण्यासाठी १.६४ लाख कोटींच पॅकेज दिलं आहे. त्यामुळे, कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी यासाठी मेहनत करणं गरजेचं आहे. बाबूंप्रमाणं काम करायचं असेल तर सरळ घरचा रस्ता धरावा असा इशारा मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिला.
BSNLकंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना याबाबतचा मोबाईल मेसेज सरकारकडून पाठवण्यात आला आहे. पाठवण्यात आलेल्या या मेसेजमध्ये सरकारने स्पष्टपणे म्हटलं आहे की, कर्मचाऱ्यांनी आता सरकारी अँटिट्यूड सोडावा आणि अपेक्षित कामगिरी करुन दाखवावी.
तसेच जर कर्मचाऱ्यांचे वर्तन आहे तसे राहिले तर कर्मचाऱ्यांना सक्तीनं घरी पाठवलं जाईल, असा संदेश देखील सरकारकडून देण्यात आला. हा संदेश कंपनीच्या जवळपास ६२,००० कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे. याबाबत वैष्णव यांनी आधीही संकेत दिले होते.
बीएनएनएलच्या वरिष्ठ व्यवस्थापकांसोबतच्या झालेल्या बैठकीतही वैष्णव यांनी कर्मचाऱ्यांना याबाबत संकेत दिले होते. आपण जर कंपनीला वाचवण्यासाठी १.६४ लाख कोटी दिले आहेत तर तसं कामही होणं अपेक्षित आहे. जर ते जमत नसेल तर तुम्ही पॅकअप करा, असा थेट इशारा त्यांनी दिला होता.
तसेच कर्मचाऱ्यांना घेण्यात येणाऱ्या अँक्शन बद्दल देखील शंका नसावी, असे स्पष्ट सांगितले होते. बीएसएनएलच्या कर्मचार्यांना तीव्र स्पर्धात्मक होण्यास सांगितले होते. तसेच रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल सारख्या खाजगी क्षेत्रातील कंपन्यांशी लढण्यासाठी सज्ज राहा असे देखील वैष्णव यांनी स्पष्ट सांगितले होते.
दरम्यान, MTNLला आता भविष्य राहिलेलं नाही, असं विधान अश्विनी वैष्णव यांनी केलं आहे. आम्ही तिथं जास्त काही करु शकत नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे की, एमटीएनएलच्या मर्यादा काय आहेत? तसेच त्याला कुठल्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आपल्याला यासाठी वेगळी मेहनत करावी लागणार आहे, असे वैष्णव म्हणाले.