महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त मुंबईत एक भाषण दिले होते. या भाषणात त्यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. मशिदींवरील भोंगे काढा अन्यथा लाऊडस्पीकर लावून हनूमान चालिसा वाजवू, असे वक्तव्य राज ठाकरेंनी केले होते. (pune mns azruddin sayyad resign)
राज ठाकरे यांच्या या भाषणामुळे राज्यभरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रसने राज ठाकरेंच्या या वक्तव्यावरुन त्यांच्यावर टीका केली आहे. अशात मनसेमध्येही काही पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेवर नाराजी दाखवली आहे.
मनसे नेते वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्यावर नाराजी दाखवली होती. त्यानंतर त्यांना अध्यक्षपदावरुन काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते आणखी नाराज असल्याचे दिसत होते. असे असताना आता मोठा धक्का बसला आहे. मनसेचे पुणे शहराचे उपाध्यक्ष अझरुद्दीन सय्यद यांनीही राजीनामा दिला आहे.
आपल्या राजीनामा पत्रात अझरुद्दीन सय्यद यांनी म्हटलं की, खरं तर कधी अशी परिस्थिती समोर येईल असं वाटलं नव्हतं. मात्र आपण ज्या पक्षात काम करतो, ज्या पक्षाला आपलं सर्वस्व समजतो. तोच पक्ष जर आपण ज्या समाजातून येतो त्या समाजाच्या विरोधात द्वेषात्मक भूमिका घेत असेल आणि स्वत:हा पक्षाध्यच भूमिका घेत असेल, तर नक्कीच पक्षाला शेवटचा जय महाराष्ट्र म्हणण्याची वेळ आली आहे.
वसंत मोरे यांना शहराध्यक्ष पदावरुन हटवले आहे, या गोष्टीवरही सय्यद यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बरं पक्षाध्यक्षांच्या भूमिकेला विरोध सोडा साधी नाराजी व्यक्त करायचा अधिकार नसावा का? वसंत मोरेंना उभा महाराष्ट्र ओळखतो. काय चुकलं त्यांचं? फक्त पक्षाध्यक्षांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली, असे सय्यद यांनी म्हटले आहे.
तसेच फक्त नाराजी व्यक्त केल्यामुळे त्यांना काय वागणूक दिली गेली, हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितले आहे. वसंत मोरे यांनी पक्षासाठी काय केलं नाही, ते सांगा? जर त्यांच्यासोबत तुम्ही असे वागत असाल तर आमचं न बोललेलंच बरं, असेही सय्यद यांनी म्हटले आहे.
ब्लुप्रिंट आणि विकासाच्या भव्य दिव्य गोष्टी एकदिवशी जेव्हा अचानक मशिदींवरील भोंग्यावर येऊन थांबतात. तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता म्हणून काहीतरी चुकीचं घडतंय हे लगेच लक्षात येतं. पक्ष स्थापन झाला तेव्हा भूमिका होती की जातीपाती विरहित राजकारण करायचं. म्हणून सर्व जाती धर्माचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षात होते आणि जीवतोड मेहनत देखील करत होते. राज ठाकरेंना एक आशेचा किरण समजत होते. पण पाडव्याच्या सभेला वेगळंच पाहायला मिळालं, असेही सय्यद यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
शरद पवारांच्या घरावर हल्ल्यासाठी पुण्यातून आणले भाडोत्री माणसं, पोलीस तपासात झालं निष्पन्न
शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याची चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा देणार – आदित्य ठाकरे
मला नेहमी जी भीती वाटत होती ती हीच होती; मनसेच्या कारवाईनंतर वसंत मोरेंनी सांगितली ‘मन की बात’