Share

पुण्यात लग्नाचे आमिष दाखवून ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेवर ३ वर्षे बलात्कार

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील पिंपरीत एका ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात आरोपीने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून त्या महिलेचे लैंगिक शोषण केले आहे. यासोबतच त्या महिलेची पैशांची फसवणूक देखील करण्यात आली आहे. शेवटी पीडित महिलेने आरोपीविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

दीपक आत्‍माराम शेंडगे असे आरोपीचे नाव असून तो सध्या भोसरी येथे राहत आहे. या प्रकरणात ३७ वर्षीय फिर्यादी महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात जाऊन शुक्रवारी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला घटस्फोटीत असून त्यांचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय आहे. या पीडित महिलेने दुसरं लग्न करण्यासाठी विवाह नोंदणीच्या वेबसाईटवरती नाव देखील नोंदवले होते.

या वेबसाईटच्या माध्यमातूनच पीडित महिलेची दिपक सोबत ओळख झाली होती. यानंतर महिलेची दीपकसोबत चांगली मैत्री झाली. ते सातत्याने एकमेकांना भेटू लागले. दिपकने त्या पीडित महिलेचा विश्वास संपादन केला आणि तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. दिपकने त्या पीडित महिलेकडून एकूण ३ लाख ७० हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने घेतले.

याव्यतिरिक्त पीडित महिला घरी नसताना स्वत: जवळील चावीने घर उघडून आरोपीने पीडितेच्या घरातील तीन लाख रुपयांचे दागिने परस्पर घेतले आहेत. यानंतर पीडित महिलेने पैसे आणि दागिने परत मागितले असता आरोपी टाळाटाळ करू लागला. तुझे अश्लील फोटो माझ्याकडे आहेत. हे फोटो मी तुझ्या कुटुंबीयांना दाखवेन, अशी धमकी आरोपी पीडित महिलेला देऊ लागला.

यावरून महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. शेवटी पीडित महिलेनं सांगवी पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. सांगवी पोलिसांनी या प्रकरणात आरोपीविरोधात बलात्कारासह, ब्लॅकमेल आणि आर्थिक फसवणुकीच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

सध्या महाराष्ट्रात बलात्काराच्या असंख्य घटना समोर येत आहेत. लग्नाचं आमिष दाखवून स्त्रियांवर बलात्कार केले जात आहेत. पुण्यातील या घटनेमुळे पुन्हा एकदा स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या वाढत्या घटनांमुळे प्रशासनावर आणि पोलीस यंत्रणेवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
गिझर वापरत असाल तर आताच व्हा सावध! बाथरुममध्येच मायलेकीला गमवावा लागला जीव
मोठी बातमी! प्रकाश आंबेडकरांवर कोसळला दुःखाचा डोंगर; मायेचा, आधाराचा हात हरपला
कर्णधारपदाच्या शर्यतीत नव्या खेळाडूची एन्ट्री; म्हणाला, ‘संधी द्या, मी तयार आहे’

क्राईम

Join WhatsApp

Join Now