Share

अभिमानास्पद! मराठमोळ्या शेतकऱ्याच्या पोराचं नाव चक्क फोर्ब्स मासिकात झळकलं

महाराष्ट्रातील शेतकरी कुटूंबातील मुलाचे नाव फोर्ब्स मासिकात आलं आहे, त्यामुळे सर्वत्र त्याचे कौतुक केले जात आहे. जगभरात विविध विषयांमध्ये चांगली आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांच्या कामाची दखल फोर्ब्स मासिकात घेतली जाते. त्यामुळे, एकदातरी आपलं नाव फोर्ब्सच्या मासिकात यावं अशी प्रत्येकाची इच्छा असते.

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे राहणाऱ्या एका शेतकऱ्याच्या मुलाचे नाव फोर्ब्स मासिकात आलं आहे. या मुलाचे नाव राजू केंद्रे आहे. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल फोर्ब्स मासिकानं त्याची दखल घेतली आहे. 2022 च्या ‘forbes30 Under30’ यादीमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे.

राजू विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील पिंप्री-खंदारे या छोटयाशा खेड्यातील भटक्या समाजाचा विद्यार्थी आहे. राजूच्या आई वडिलांचे साधे प्राथमिक शिक्षणही झालेलं नाही. राजूच्या माध्यमातून केंद्रे कुटुंबातील पहिलीच पिढी उच्च शिक्षण घेणारी ठरली आहे, असं त्याचे पालक सांगतात.

राजू जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी होता. अधिकारी व्हावं  म्हणून पदवीच्या  शिक्षणासाठी तो पुण्यात गेला. मात्र, फर्ग्युसन कॉलेजमध्ये योग्य मार्गदर्शनाच्या अभावी प्रवेश मिळाला नाही. त्यानं BPO मध्ये काम करण्याचा प्रयत्न केला.मात्र, तिथही त्याचा टिकाव लागला नाही, त्याने पुणे सोडले.

आजही क्षमता असताना अनेक विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या व्यवस्था आणि परिस्थिती समोर मुकावे लागते. त्यामुळे अनेक विद्यार्थी झोपडपट्टीत,वाड्यात, पाड्यात पाहिला मिळतात. या सगळ्या परिस्थिती मधून राजू गेल्याने त्यानं त्यावर काम करण्यासाठी संघर्षाचं प्रतीक असणारं ‘एकलव्य’ नावाचं एक व्यासपीठ तयार केलं. या व्यासपीठाचा मुख्य उद्देश, विद्यार्थ्यांच्या उच्चशिक्षण मार्गातील अडचणी कमी व्हाव्यात आणि जागतिक दर्जाचं शिक्षण मिळावं हा होता.

शिक्षण घेत असताना, त्याने मेळघाट या आदिवासी भागातील समस्या पाहिल्या आणि त्यावर काम करायचं ठरवलं. टाटा इनस्टिट्युटमधून ग्रामीण विकास विषयात पदव्युत्तर शिक्षण घेताना त्याने ग्रामपरिवर्तन चळवळीद्वारे स्वतःच्या गावातच काम करायचे ठरवले. 2015 मध्ये त्याला ग्रामपंचायत निवडणूक लढवायची होती, मात्र समाजाने त्याला खेचलं.

या काळात त्याने पारधी समाजासाठी विकासकामे केली. त्याच्या कार्याची दखल महाराष्ट्र सरकारने घेतली. राजू केंद्रे हा ‘एकलव्य इंडिया’ याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी मार्गदर्शन करतो. सध्या चेवनिंग स्कॉलरशिपवर SOAS- युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमध्ये डेव्हलपमेंट स्टडीज शिकत आहे. याठिकाणी तो ‘भारतातील उच्च शिक्षण आणि असमानता’ या विषयावर संशोधन करत आहे.

फोर्ब्स मासिकानं राजुने केलेल्या त्याच्या या सर्व कामगिरीबाबत एक स्टोरी प्रकाशित केली आहे. ‘फोर्ब्स’ इंडिया फेब्रुवारीच्या अंकात सविस्तर यादी आणि त्याची स्टोरी पब्लिश झाली आहे. ही यादी आता ऑनलाईनही उपलब्ध होणार आहे. त्याच्या कामाची दखल घेतल्याबद्दल राजू केंद्रे आणि त्याचे कुटुंब यांना प्रचंड आनंद झाला आहे.

इतर

Join WhatsApp

Join Now