काँग्रेस पक्षामध्ये सध्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणूकीवरून अंतर्गत वातावरण तापलं आहे. त्यातच काँग्रेस अध्यक्षपदी राहुल गांधी यांनीच राहावं अशी काँग्रेसच्या काही नेत्यांची इच्छा आहे. याला आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र विरोध दर्शवला आहे.
राहुल गांधी यांच्या बिनविरोध निवडीचा ठराव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने काल मंजूर केला. हा ठराव माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मांडला. त्याला माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे आणि नसीम खान यांनी त्याला अनुमोदन दिलं. उपस्थित सर्व प्रतिनिधींनी त्याला हात उंचावून समर्थन दिलं.
मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यावेळी हातवर केला नाही. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक व्हावी आणि राहुल गांधी यांनी त्यात भाग घ्यावा, अशी पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका आहे. चव्हाण हे काँग्रेसच्या G-२३गटातील आहेत. त्यामुळे त्यांची मागणी आहे की, ‘पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष हवा.’
दरम्यान, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रस्ताव मांडला. प्रस्तावाला सर्व प्रादेशिक लोकप्रतिनिधींनी एकमताने मंजुरी दिली होती. काल १९ सप्टेंबर २०२२ रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनिर्वाचित राज्य प्रतिनिधींची बैठक झाली होती.
या बैठकीला राज्य निवडणूक अधिकारी, माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू, प्रदेश प्रभारी एच.के.पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्ष काँग्रेस पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आदी उपस्थित होते.
माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. या कार्यक्रमांतर्गत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया २४ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत चालणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख तारीख ८ ऑक्टोबर आहे. १७ ऑक्टोबरला निवडणुका होणार असून १९ ऑक्टोबरला निकाल लागणार आहे.