केंद्र सरकारने युद्धबंदीबाबतचे सर्व दावे फेटाळले असताना, भाजपचे माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दावा केला आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया आणि युक्रेनमधील युद्ध ३ तास थांबवले होते. पंतप्रधान मोदींनी भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी संवाद साधला होता.
रविशंकर प्रसाद म्हणाले की, पंतप्रधानांनी युक्रेन आणि पुतिन या नेत्यांना सांगितले होते की, ते भारतीय विद्यार्थ्यांना युद्धक्षेत्रात एकटं सोडणार नाहीत. त्यांच्या चर्चेनंतर भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित मार्ग देण्यासाठी तीन तास लढाई थांबवण्यात आली. जगात आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे स्थान आहे.
याआधीही भारत सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी रशिया-युक्रेन युद्ध काही तासांसाठी थांबवल्याची बातमी मीडियामध्ये प्रसिद्ध झाली होती. परंतु ३ मार्च रोजी परराष्ट्र मंत्रालयाने या वृत्ताचे खंडन केले होते. मात्र रविशंकर प्रसाद यांनी केंद्राने युद्ध थांबवले असा दावा केल्याने चर्चेला उधाण आले आहे.
तसेच म्हणाले, हा स्वाभिमानी आणि सुरक्षित भारत आहे. ३७० मुळे काश्मीरमध्ये भारतीय कायदा लागू होत नव्हता. हाताने सफाई करणाऱ्या कामगारांना लागू असलेला शिक्षणाचा कायदा लागू होत नव्हता. ओबीसींना आरक्षणाचा लाभ मिळाला नव्हता. आता भारत सरकारच्या कार्यालयात दलालांनी येणे बंद केले आहे.
सरदार पटेल यांचा आज जगातील सर्वात मोठा पुतळा उभारण्यात आला आहे. सुभाषचंद्र बोस यांचा विसर पडला होता. त्यांचा पुतळा आता राजपथावर बसवला जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाच तीर्थक्षेत्रांना विकसित करण्यात आले, असेही रविशंकर प्रसाद म्हणाले.
रशिया आणि युक्रेन युद्धाबद्दल बोलताना म्हणाले, शुक्रवारी रशिया-युक्रेन युद्धाला १०३ दिवस पूर्ण झाले आहेत. या युद्धात युक्रेनच्या रस्त्यांवर रक्ताच्या नद्या वाहू लागल्या आहेत. हे शतकातील सर्वात मोठे मानवी संकट असल्याचे मानले जाते. या युद्धात सुमारे ६८ लाख लोकांनी देश सोडला आहे. असे रविशंकर प्रसाद यावेळी म्हणाले.