पंतप्रधान किसन सन्मान योजनेचा लाभार्थी असणाऱ्या एका शेतकऱ्याला अचानक या योजनेमार्फत मिळणारे पैसे मिळणे बंद झाले. त्याने वाट पाहुन शेवटी संबधित कृषी कार्यालयाला भेट दिली. तिथे गेल्यावर त्याला कळले की, त्याला मूर्त घोषीत करून संबंधित खाते बंद केले आहे. यावरून त्याला स्वतः जिवंत असल्याचा पुरावा देण्यासाठी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत.
संबंधित घटना अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील असून, शेतकऱ्याचे नाव आण्णासाहेब दामोदर काळे आहे.
पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभार्थी असलेला हा शेतकरी योजनेचे पैसे का मिळत नाही, याची चौकशी करण्यासाठी कार्यालयात गेला. त्याने चौकशी केली असता तो मृत झाल्याची माहिती संबंधित कृषी कार्यालयाला मिळाल्याने त्याचे खाते बंद करण्यात आल्याचे समजले.
यावर शेतकऱ्याला धक्का बसला. त्याच्या सोबत होत असलेल्या घटनेबद्दल त्याने तालुक्याच्या तहसीलदारांची भेट घेतली आणि आपली व्यथा मांडली. त्यानंतर तहसीलदाराने त्याला संबंधित विभागाचे काम पाहणाऱ्या अव्वल कारकुनाकडे पाठवले. मात्र, तेथे गेल्यावर शेतकऱ्याला धक्का बसला.
शेतकऱ्याला कळाले की संबंधित विभागाचे कारकून म्हणून काम पाहणारा सरकारी कर्मचारी नव्हे तर कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेला कोतवाल आहे. हा सर्व गोंधळ पाहून शेतकरी चक्रावून गेला. राहुरी तालुक्यात अवैध वाळू उपसा चालतो. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी गावोगावी असे मानधनावर कोतवाल नियुक्त करण्यात आले आहेत. त्यातीलच एकावर या महत्वाच्या कामाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
तरीही शेतकरी या कोतवालाकडे स्वतः ची व्यथा घेऊन गेला. चौकशी केल्यानंतर, तुमचे प्रकरण नगरच्या वरिष्ठ कार्यालयात पाठवलं आहे, असं उत्तर त्या कर्मचाऱ्याने दिले. मात्र, आद्यप शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला नाही. अजूनही शेतकऱ्याला आपण जिवंत असल्याचे पुरावे घेऊन फरपट करावी लागत आहे.
शेवटी शेतकऱ्याने त्याची व्यथा प्रसार माध्यमांसमोर मांडली. काळे यांनी सांगितले की, मी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभार्थी आहे. मला सुरुवातीपासूनच केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ झाला. मात्र, काही दिवसांनी माझे खाते बंद झाले. त्यासंबंधी राहुरी येथील कृषी विभागात चौकशी केली. कृषी सहायकांनी सांगितलं की, तुमचे खाते बंद करण्यात आलं आहे. तुम्ही मृत असल्याची माहिती कळवण्यात आल्याने वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार खाते बंद करण्यात आले आहे.सध्या मला स्वतः ला जिवंत असल्याचा पुरावा घेऊन फिरावे लागत आहे .मात्र, अद्याप मला न्याय मिळाला नाही.’