गेल्या अनेक दिवसांपासून मराठी अभिनेत्री केतकी चितळे हे प्रकरण राजकीय वर्तुळात गाजत आहे. केतकी चितळे हिनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर फेसबुकच्या माध्यमातून एक आक्षेपहार्य पोस्ट टाकत टीका केली होती. यावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या, आता या प्रकरणावर दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी भाष्य केले आहे.
शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेविरोधात पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. सध्या केतकी चितळे न्यायालयीन कोठडीत आहे. प्रवीण तरडे पिंपरी चिंचवड येथे पत्रकारांशी बोलत होते त्यावेळी त्यांनी या प्रकरणावरून आपले मत मांडले आहे.
प्रवीण तरडे म्हणाले, केतकी प्रकरणाबद्दल मला खरच काही माहिती नाही. हे प्रकरण झालं तेव्हा मी माझ्या चित्रपटाच्या कामात आणि प्रमोशनमध्ये होतो. पण चित्रपट सृष्टीत काम करणाऱ्या कोणत्याच कलाकाराने राजकीय भूमिका घेऊन नयेत या मताचा मी आहे, असे प्रविण तरडे म्हणाले.
तसेच म्हणाले, मी चित्रपट काढला तर प्रत्येक घटक तो बघणार आहे, माझ्यावर प्रेम करणार आहे. माझ्या अभिनयामुळे, माझ्या कामाप्रती असणाऱ्या प्रेमामुळे मी काहींचा आयडॉल झालो आहे. त्याचा वापर मी कुठल्या राजकीय पक्षासाठी नाही केला पाहिजे.
प्रवीण तरडे म्हणाले, कलाकार हा समाजाचा देणं असू शकतो. समाजाने प्रश्न विचारावेत त्यानं त्याचं उत्तर द्यावे या मताचा मी आहे. त्यामुळे प्रवीण तरडे तुम्हाला आयुष्यात कधी कुठल्या राजकीय व्यासपीठावर दिसणार नाही. ज्या दिवशी ते करेल तेव्हा त्याच दिवशी क्षेत्र बंद करेल असेही ते म्हणाले.
दरम्यान, शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या केतकीचा जामीन अर्ज न्यायालयाने २६ मे रोजी फेटाळला होता. केतकी चितळेला १४ मे रोजी अटक करण्यात आल्यानंतर तिने न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर जामीन अर्ज ठाणे न्यायालयाकडे केला होता तो फेटाळण्यात आला आहे. मागील १५ दिवसांहून अधिक काळापासून केतकी अटकेत आहे.