आगामी निवडणूक जवळ आली असताना, आता प्रत्येक पक्ष आपापली रणनीती ठरवू लागला आहे. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आता भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
वर्तकनगर मधील भीमनगर भागात भाजप प्रवेशाच्या कार्यक्रमावेळी, शिवसेनेतील नाराज कार्यकर्ते आता भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, यावरुन दरेकरांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. प्रवीण दरेकर म्हणाले, शिवसेनेची ताकद ही तळागाळातले कार्यकर्ते आहेत परंतु त्यांच्याकडे आता दुर्लक्ष होत असल्याने ते नाराज आहेत. मी शिवसेनेत असताना नगरसेवकाचं तिकीट मिळालं नाही परंतु भाजपमध्ये प्रवेश केल्यावर विरोधी पक्षनेता बनलो असे वक्तव्य केले.
तसेच म्हणाले, शिवसेनेतील तळागाळातील कार्यकर्ते आणि शाखा प्रमुख शिवसेनेची ताकद होती. परंतु हा गट आता नाराज असल्याने भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. मराठी माणसाला आता भाजपशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. कार्यकर्त्यांच्या जाण्याने शिवसेनेला फरक पडणार नाही. शिवसेनेतील अस्वस्थ कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात येत आहे.
अस्वस्थ शिवसैनिकाला आम्ही आधार दिला आणि भाजपमध्ये प्रवेश दिला. मी भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये असताना साधे नगरसेवकाचे तिकीट मिळाले नाही. परंतु भाजपने मला पक्षात घेवून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद दिले. त्यामुळे आता जे कोणी नाराज, अस्वस्थ असतील त्यांनी गाडी फुल व्हायच्या आधी या, अन्यथा नंतर लटकत यावे लागेल, अशी मिश्किल टिपण्णीही प्रवीण दरेकर यांनी केली.
दरम्यान ठाण्यातून दरेकरांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर देखील टीकास्त्र सोडलं आहे. म्हणाले, हे नेते एकमेकांवर टीका करत असतात परंतु त्यांना नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही. मालमत्ता कराबाबत गाजर दाखवण्यात येत आहे.
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना भाजपची भिती वाटते आहे. पर्यटन, कोकणासाठी काय केले असा सवाल करत कृती करुन दाखवावी असे प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. प्रवीण दरेकर यांनी शिवसेना आणि एकूणच महाविकास आघाडीवर केलेल्या टीकेमुळे आता विरोधक कोणती प्रतिक्रिया देतील हे पाहावे लागेल.