मुंबई : :छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्ये करण्यातची स्पर्धाच भाजप नेत्यांमध्ये लागली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वादग्रस्त भाषणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असतानाच भाजप नेते प्रसाद लाड यांचे एक वादग्रस्त विधान समोर आले आहे. भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड म्हणाले की शिवरायांचा जन्म कोकणात झाला.
नेमकं काय म्हणालेत प्रसाद लाड? ‘हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. अखिल भारताचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला. शिवरायांचे बालपण रायगडमध्ये गेले आणि याच रायगडमध्ये त्यांनी स्वराज्याची शपथ घेतल्याचे प्रसाद लाड यांनी म्हटले आहे.’
प्रसाद लाड यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ राष्ट्रवादीच्या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. “भाजप आमदार प्रसाद लाड यांनी कोकण उत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, असे विधान केले. इतरांना इतिहास शिकवण्यापेक्षा तुमच्या आमदारांना इतिहासाचा धडा शिकवा!”, असे ट्विट राष्ट्रवादीने केले आहे.
https://twitter.com/NCPspeaks/status/1599255784327909376?s=20&t=cMmlujTcFQ7b6EqbqhcAUQ
यापूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांची थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केली आहे. तेव्हापासून कोश्यारी यांना हटवण्याच्या मागणीसाठी राज्यभर निदर्शने केली जात आहेत. भाजप नेत्यांकडून एकापाठोपाठ एक वादग्रस्त विधाने केली जात आहेत. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, राज्यमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यानंतर आता प्रसाद लाड यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे.
प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. लाड यांनी क्षणाचाही विलंब न लावता महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी होत आहे. छत्रपती संभाजीराजेंनीही प्रसाद लाड यांच्या वक्तव्याच्या निषेध करत त्यांना झाप झाप झापले आहे.
“प्रसाद लाड यांचं विधान हे बेजबाबदार वक्तव्य आहे. त्यांच्या या विधानाचा मी निषेध करतो. त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे. शिवरायांचा वारंवार केला जाणारा अपमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही”, असं संभाजीराजे म्हणालेत.
प्रसाद लाड हा मुर्ख माणूस आहे. भाजपा महाराजांचा अपमाना हा प्लान करून करतोय का? अवघ्या महाराष्ट्राची माफी मागा, असंही छत्रपती संभाजीराजे म्हणालेत.
ल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले जात आहे. या सर्व विधानांवर खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झाले आहेत. रायगडमध्ये त्यांनी नुकतीच ‘निर्धार शिव सन्मान’ची बैठक घेतली होती. त्यात त्यांनी खालील शब्दांत शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना सोडणार नसल्याचे म्हटले आहे, जाणून घेऊयात उदयनराजे नेमके काय म्हणालेत.
महाराज, आपण इथल्या किल्ल्यात, पर्वतात, नदीत जंगलात, डोंगररांगात मातीच्या प्रत्येक कणात आणि प्रत्येक माणसाच्या मनात आहात. आपल्याबद्दल लिहिल्या, बोलल्या जाणा-या प्रत्येक शब्दात आनंदी तेवढाच आदर असतो. अभिमान असतो. डोक्यात मोठा आणि छोटा मेंदू जागच्या जागी असलेली प्रत्येक व्यक्ती आपल्या समोर नतमस्तक आहे. पण छोटा आणि मोठा मेंदू सोडून, काही मुठभर लोकांच्या डोक्यात एक खोटा मेंदू असतो.
सटकून डोक्यावर पडलेली दोन-चार मंडळी आपल्याबद्दल चुकीच्या बाबी प्रचलित करण्याचा प्रयत्न करतात. वाईट वाटतं विचार स्वातंत्र्य, भाषा स्वातंत्र्य आणि व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखालील हि विकृती आहे. हे स्वातंत्र्य नाही तर स्वैराचार आहे. आपल्या विषयी मला वाटेल तसं आणि मनाला येईल तसं वागेन असं जर कोणी म्हणत असेल तर त्याची नांगी जिरवावीच लागेल. हा आपल्या सारख्या विश्वाचे दैवत असलेल्या छत्रपतीचा मुद्दा आहे. यात तडजोड नाही.
आपल्यावर आमचा जेवढा हक्क आहे तेवढाच हक्क प्रत्येक मावळयाचा आहे. मायमाऊलीचा हक्क आहे. वडीलधा-यांचा आणि सर्वांचाच दक्क आहे म्हणून आपल्याबद्दल चुकीचे उद्गार काढण्याची हिंमत दाखवणा-या विकृत लोकांना आम्ही थेट उत्तर दिले आहे, पण आम्हाला ही प्रवृत्ती मोठी करायची नाही. मुठभर लोकांच्या मनातील ही विकृती कायमची ठेचायची आहे. ही एकट्या दुकटयाची किंवा श्रेय घेण्याची लढाई नाही.