मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी लवकरच ‘पावनखिंड’ (Pawankhind) या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १८ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार असून नुकतीच या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात प्राजक्ता एका महत्त्वाच्या भूमिकेत (Prajakta Mali in Historical Character) दिसणार आहे. तर पावनखिंड चित्रपटाद्वारे तिची एखाद्या ऐतिहासिक चित्रपटात काम करण्याची इच्छा पूर्ण झाल्याचे तिने नुकतीच तिने एका पोस्टद्वारे सांगितले आहे.
प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर मराठी साजमधील तिचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने लिहिले की, ‘पारंपारिक मराठमोळा साजशृंगार करणं मला किती आवडतं, तुम्हाला काय सांगू.. तो मराठी थाट मोठ्या पडद्यावर दाखवता यावा, आपण एखादा ऐतिहासिक चित्रपट करावा, अशी खूप दिवसांची इच्छा होती. ‘पावनखिंड’ च्या निमित्ताने ती पूर्ण झाली. ‘श्रीमंत भवानीबाई बांदल’ यांची व्यक्तीरेखा साकारण्याच्या निमित्ताने दिग्पाल दादाने आयोजिलेल्या ‘श्री शिवराज अष्टक’चा भाग होता आलं, याचाही आत्यंतिक आनंद’.
पुढे प्राजक्ताने तिच्या चाहतींना मराठी साज करून फोटो शेअर करण्याचे आवाहन केले आहे. तिने लिहिले की, ‘माझ्याप्रमाणे ज्यांना ज्यांना पारंपरिक मराठी साज करायला आवडतो, त्यांनी तुमचे फोटो सोशल मीडियावर टाका आणि मला टॅग करा. सगळे फोटो १८ तारखेला माझ्या स्टोरीवर झळकतील’. यासोबतच प्राजक्ताने #सह्याद्रीच्यालेकी, #ऊरफाटेस्तोवरअभिमान असे हॅशटॅगही वापरले आहेत.
नुकतीच प्राजक्ता तिचा एक व्हिडिओ शेअर करत चित्रपटगृह पूर्ण क्षमतेने उघडण्यास परवानगी देण्याची सरकारकडे विनंती करताना दिसून आली होती. व्हिडिओत प्राजक्ताने म्हटले होते की, ‘कोरोनाचा जोर बऱ्यापैकी ओझरलेला आहे, अनेक नियमांमध्येही शिथिलता आणण्यात आली आहे. परंतु, अद्याप चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे ५० टक्के क्षमतेने सुरु आहेत. त्यामुळे आम्हा सर्व कलाकारांची सरकाराला विनंती आहे की, चित्रपटगृह आणि नाट्यगृह १०० टक्के क्षमतेने सुरु करण्याची परवानगी देण्यात यावी’.
‘लवकरच शिवजयंती येणार आहे. त्यामुळे शिवप्रेमींना, निर्मात्यांना आणि चित्रपट प्रेमींना लवकरच लवकरच सरकारडून ही आनंदाची बातमी मिळेल, अशी आशा आहे. तसेच याचा खरंच सर्व कलाकारांना आणि चित्रपट निर्मात्यांना फायदा होईल’, असेही तिने व्हिडिओत म्हटले होते.
दरम्यान, ‘पावनखिंड’ या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केलं आहे. पावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडे, बांदल सेना आणि मावळ्यांनी दिलेल्या लढ्याचा थरार या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. यामध्ये अभिनेता चिन्मय मांडलेकरने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तसेच चित्रपटात मृणाल कुलकर्णी, प्राजक्ता माळी, अंकित मोहन, क्षिती जोग, समीर धर्माधिकारी यांच्याही मुख्य भूमिका आहेत. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १८ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रेक्षकांना हा चित्रपट सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बप्पी लहरी यांच्याकडे होतं तब्बल एवढ्या लाखांचं सोनं, चहा पिण्यासाठी घेतला होता सोन्याचा टी सेट
तब्बल ‘एवढ्या’ कोटींची संपत्ती मागे सोडून गेले बप्पी लहरी, सोन्याप्रमाणे महागड्या गाड्यांचीही होती आवड
बप्पी लहरींच्या या गाण्याचा मायकल जॅक्सनही होता फॅन, गळ्यातील सोनं पाहून म्हणाला होता..