ते याबाबत माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘प्रत्येक उमेदवाराला ४२ मतं द्यायची हे आम्ही ठरवलं होतं. त्याप्रमाणे राष्ट्रवादीच्या आमदारांनी योग्य पद्धतीने मतदान केलं. संजय राऊत यांना देखील ४२ मतं मिळाली असती, पण शिवसेना आमदार सुहास कांदे यांचं मत बाद ठरवल्याने त्यांना ४१ मतं मिळाली.’
या निकालावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. “मला धक्का बसेल असा हा निकाल नाही. प्रत्येक उमेदवाराच्या मतांची संख्या बघितली तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांच्या कोट्यामध्ये काही फरक पडलेला नाही,” असे शरद पवार यांनी म्हंटले आहे.
ते पुण्यात याबद्दल माध्यमांशी बोलत होते. यावेळी पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, ‘आम्हाला पाठिंबा देणारे जे इच्छुक होते त्यांना आपल्या बाजूने घेण्यासाठी भाजपाने जी कारवाई केली त्यामध्ये त्यांना यश आले. भाजपाने अपक्षांची जी मोट बांधण्याचा प्रयत्न केला, त्यात फडणवीस यशस्वी झाले आणि त्याचाच फरक पडला. चमत्कार झाला हे मान्य केलं पाहिजे.’
दरम्यान, ‘राज्य सरकारच्या स्थिरतेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे यावेळी बोलताना शरद पवारांनी स्पष्ट केले. सरकारसाठी आवश्यक असणारे संख्याबळ महाविकास आघाडीकडे आहे हे या मतांवरून स्पष्ट दिसून येत असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी सात उमेदवारांमध्ये शुक्रवारी मतदान पार पडलं. राज्यसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणारे शिवसेनेचे संजय पवार यांचा भाजपाचे धनंजय महाडिक यांनी पराभव केला आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
सहाव्या जागेसाठी शिवसेनेच्या संजय पवार आणि भाजपाच्या धनंजय महाडिकांमध्ये जोरदार लढत सुरू होती. त्यामध्ये धनंजय महाडिकांनी बाजी मारली आहे. काल झालेल्या मतमोजणीत पहिल्या पसंतीची मतं घेऊन शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी आणि भाजपचे पीयूष गोयल व अनिल बोंड विजयी झाले.