उदय सामंत (Uday Samant)महाराष्ट्रात शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद थांबतच नाही आहे. मंगळवारी सायंकाळी माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर काही लोकांनी हल्ला केला. घटनेच्या वेळी आमदार गाडीतच होते. या हल्ल्यामागे ठाकरे समर्थक शिवसैनिकांचा हात असल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.
तानाजी सावंत यांच्या घरी जाताना कात्रज चौकात हा हल्ला झाला होता. या प्रकरणी शिंदे गटाकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनीही या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ”आमच्या आमदारांवर असे हल्ले होत असेल, तर आम्हालाही त्यांच्यावर हल्ले करावे लागतील”, असे ते म्हणाले.
हा योगायोग की कोणाचा खेळ याबद्दल संभ्रम
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिंदे गटाचे आमदार उदय सामंत त्यांच्या ताफ्यासह जात होते. कात्रज चौकात काही लोकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी परिसरात जाहीर सभेचे आयोजन केल्याचे सांगण्यात येत आहे. ठाकरे यांना पाठिंबा देणाऱ्या शिवसैनिकांनी हा हल्ला केल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार प्रमोद भरत गोगावले यांनी केला आहे.
उदय सामंत यांचा ताफा कात्रज चौकात पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी कात्रजमध्ये आदित्य ठाकरे यांची सभा संपवून शिवसैनिक परतत होते. त्याचवेळी उदय सामंत यांची गाडी तानाजी सावंत यांच्या घराकडे जात होती. संतापलेल्या शिवसैनिकांनी उदय सामंत यांच्या गाडीची मागील खिडकी तोडल्याचा आरोप आहे. त्याचवेळी आदित्य ठाकरे आणि विनायक राऊत यांनी हा हल्ला शिवसैनिकांनी केला नसल्याचं म्हटलं आहे.
पुढे अब्दुल सत्तार काय म्हणाले,
या हल्ल्याचा जितका निषेध करावा, तितका कमी आहे. ही तत्वाची लढाई आहे, ती निश्चित लढावी. पण असा हल्ला करणं चुकीचं आहे. असे हल्ले आमच्या आमदारांवर होत असेल तर आम्हालाही त्यांच्यावर असे हल्ले करावे लागेल. एका कडून मारल्या जात असेल तर दुसऱ्याकडून बघायची भूमिका घेतल्या जाऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.
शिवसेना नेते बबन थोरात यांनी केलेले वक्तव्य, ‘दिसेल तिथे आमदारांच्या गाड्या फोडा, त्यांचा सत्कार उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येईल.’ कोणी असे वक्तव्य करत असेल आणि उद्धव ठाकरे त्यांचा सत्कार करत असतील, तर उद्धव ठाकरेंचा यासर्व प्रकाराला पाठिंबा आहे, असा त्याचा अर्थ निघतो.
त्यामुळे उद्धव ठाकरेंवरही कारवाई करावी लागेल, असेही अब्दुल सत्तार म्हणाले. या हल्ला करणाऱ्यांचा तपास घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच या हल्ल्याच्या मागे कोणाचा हात आहे, याचा सुद्धा शोध घ्यायला हवा, असेही ते म्हणाले.