Share

Telangana: चेकपोस्टवर भाजप नेत्याच्या कारमध्ये पोलिसांना सापडली नोटांची रास; विचारणा केली असता म्हणाला…

भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याच्या कारमध्ये १ कोटी रुपये सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना तेलंगणाच्या नालगोंडा जिल्ह्यात घडली आहे. चेलमेडा चेक पोस्टवर तैनात असलेल्या पोलिसांनी भाजप नेत्याच्या कारमधून १कोटी जप्त केले आहेत.

येत्या ३ नोव्हेंबरला नालगोंडाच्या मुनुगोडे विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. त्याआधी भाजप नेत्याच्या कारमधून रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ निर्माण झाली आहे.

नालगोंडाच्या पोलीस अधीक्षक रेमा राजेश्वरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ ऑक्टोबरला जिल्हा पोलिसांचं पथक नेहमीप्रमाणे वाहनांची तपासणी करत होतं. त्यादरम्यान दुपारी ३ वाजता चेलमेडा चेक पोस्टवर एक टाटा सफारी रोखण्यात आली.

ही कार एस. वेणू नावाची व्यक्ती चालवत होता. तो तेलंगणाच्या करीमनगरच्या भाजप नगरसेविका सी. जे. वेणू यांचा पती आहे. असे रेमा राजेश्वरी यांनी माहिती दिली. तसेच म्हणाल्या, आमच्या पोलीस पथकानं या भाजप नेत्याच्या कारची तपासणी केली. त्याला डिक्की उघडण्यास सांगितलं.

त्यात एक मोठी बॅग सापडली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोकड होती. ही रक्कम मोजण्यात आली. ती एक कोटींच्या घरात होती. वेणुला याबद्दल विचारणा करण्यात आली. मात्र त्याला समाधानकारक उत्तर देता आलं नाही. त्यांना कोणतीही कागदपत्रं दाखवता आली नाहीत, असे पोलीस अधीक्षक रेमा राजेश्वरी यांनी सांगितले.

दरम्यान, ही रक्कम बेहिशेबी असल्याचं मानून पोलिसांनी ती जप्त केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. जप्त करण्यात आलेली रक्कम आयकर विभागाला पाठवण्यात आली आहे. मात्र, या घटनेने सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा होत आहे.

राजकारण

Join WhatsApp

Join Now