कॉंग्रेस सातत्याने केंद्र सरकारवर टिका करत आहे. विरोधक मोदी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडताना पाहायला मिळत नाहीये. अशातच आता थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर हल्लाबोल चढवला आहे. मोदी यांनी बर्लिनमध्ये राहत असलेल्या भारतीयांना संबोधित करताना अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर टीका केली आहे.
सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन दिवसांच्या यूरोप दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याची सुरुवात जर्मनीपासून झाली आहे. मोदी जर्मनीनंतर डेन्मार्क आणि फ्रान्सला भेट देणार आहेत. जर्मनीतील बर्लिनच्या पॉट्सडामर प्लाट्जमध्ये अनिवासी भारतीयांशी नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला.
“आमच्या कार्यकाळात लाभ लोकांच्या खात्यात पोहोचला. कोणत्याही मध्यस्थाशिवाय हे शक्य झालं. आता कोणत्याही पंतप्रधानांना हे म्हणावं लागणार नाही की मी १ रुपया पाठवतो, तर १५ पैसे पोहोचतात,” असं मोदींनी सांगितलं. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर टीका केली आहे.
तसेच पुढे बोलताना मोदी म्हणाले, ‘तो कोणता पंजा होता जो ८५ पैसे घासून घेत होता,’ असंही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. याचबरोबर ‘मी इथं माझ्याबद्दल सांगण्यासाठी आलो नसून मोदी सरकारबद्दल बोलण्यासाठी आलो, असल्याचं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
दरम्यान, गेल्या ३० वर्षांपासून भारतीय जनतेनं एक बटन दाबून अस्थिरता संपवली असल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच मोदी सरकार आवश्यक सुधारणांद्वारे देशात परिवर्तन घडवत असल्याचं मोदी म्हणाले. याचबरोबर सुधारणा करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.
‘आज भारत देश प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे. आता आपला देश लहान विचार करत नाही. भारतात इंटरनेट कनेक्टिव्हिटी सर्वात वेगवान आहे. 6 लाख गावे ऑप्टिकल फायबरने जोडली गेली आहेत. लवकरच 5जी येत असल्याची माहिती देखील नरेंद्र मोदींनी दिली.