पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा पंधरावडा निमित्त बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई येथे “समाजातील बुद्धिजिवी लोकांच्या सोबत संवाद” या कार्यक्रमाचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं.
यावेळी खासदार प्रीतम मुंडे यांची देखील विशेष उपस्थिती होती. या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पंकजा मुंडे यांनी राजकारणात सुरू असलेल्या वंशवादावर चर्चा केली. याबाबत बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील चॅलेंज दिलं.
पंकजा मुंडे म्हणाल्या, मोदींना वंशवादाचं राजकारण संपवायचं आहे. मी देखील वंशवादाचं प्रतिक आहे, पण मला कोणी संपवू शकणार नाही. मोदीजींनी पण ठरवून मला संपवायचा प्रयत्न केला तर ते सुद्धा मला संपवू शकत नाहीत. असं खळबळजनक विधान पंकजा मुंडे यांनी यावेळी केले.
तसेच म्हणाल्या, जर मी तुमच्या मनावर राज्य केले तर ते तसं करु शकणार नाहीत. पुढे म्हणाल्या, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला राजकारणात स्वच्छता आणायची आहे. आपल्याला जात, पात, पैसा, प्रभाव याच्या पलीकडे जाऊन विचार करायचा आहे.
दरम्यान, पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहेत. कारण फडणवीस सरकार गेल्यानंतर त्यांना विधानपरिषदेवर भाजपनं पाठवलं नाही. तसेच आता महाविकास आघाडीचं सरकार जाऊन शिंदे-फडणवीसांचं सरकार सत्तेत असतानाही त्यांना डावलण्यात आल्यानं त्या नाराज आहेत.
असे असले तरी, भाजपनं त्यांना पक्षांतर्गत मोठी जबाबदारी सोपवली आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवरच त्या नाराज असल्याचं बोललं जात आहे. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ पंकजा मुंडे देखील राष्ट्रवादीत दाखल होतील की काय अशी चर्चाही मध्यंतरी राजकारणात रंगली होती.