Share

पंकजा मुंडेंना मिळणार विधान परीषदेची आमदारकी; पुन्हा होणार राज्याच्या राजकारणात सक्रीय

महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षांपासून सक्रिय नसलेल्या पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा लोकल पॉलिटिक्स करण्याची संधी मिळू शकते अशा चर्चा सध्या सुरू आहेत. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

२०१९ मध्ये विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांच्याविरोधात हार पत्करावी लागल्यानंतर पंकजा मुंडे यांना आता पुन्हा कधी संधी मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मागील वेळीदेखील विधान परिषदेवर जाण्याची त्यांची संधी हुकली होती. त्यानंतर त्यांना राष्ट्रीय राजकारणात संधी देण्यात आली.

भाजपनं पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय सचिवपद तसेच मध्य प्रदेश भाजप प्रभारी पद दिलं. त्यानंतर अनेक वर्षांपासून पंकजा मुंडे राज्याच्या राजकारणात सक्रिय दिसल्या नाहीत. मात्र, आता विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

येत्या 20 जून रोजी विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यात भाजपच्या वतीनं पंकजा मुंडेंच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत आहेत. विधानपरिषदेच्या निमित्ताने त्यांना महाराष्ट्र विधीमंडळाशी पुन्हा जोडले जाण्याची संधी मिळू शकते. या संदर्भातील दावा झी न्यूज नेटवर्कने केला आहे.

पंकजा मुंडे यांना ज्या दिवशी भाजपचं राष्ट्रीय सचिवपद तसेच मध्य प्रदेश भाजप प्रभारी पद देण्यात आलं तेव्हापासून, भाजपच्या राज्यातील विविध कार्यक्रमांमध्ये अनेक दिवसांपासून पंकजा मुंडे जवळपास गैरहजरच राहिलेल्या दिसून आल्या.

मुंबईतील ओबीसी आरक्षणासाठीचा मोर्चा असो वा औरंगाबादमधील जल आक्रोश मोर्चा असो. मराठवाड्यातील आक्रमक नेत्या म्हणून परिचित असलेल्या पंकजा मुंडे यांना या राजकीय आंदोलनात संधी मिळाली नाही अथवा त्यांना आमंत्रितही करण्यात आलं नव्हतं.

नुकतंच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनाला त्यांनी महाराष्ट्रातील दिग्गज भाजप नेत्यांना आमंत्रित न करता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना आमंत्रित केलं होतं. यावरूनही पंकजांची महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवर नाराजी दिसून आली. मात्र पंकजांची ही नाराजी विधानपरिषदेच्या उमेदवारीद्वारे दूर करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असे बोलले जात आहे.

दरम्यान, विधान परिषदेवर पंकजा मुंडे गेल्यास बीड विधानसभा निवडणुकीत भक्कम विजय मिळवलेल्या धनंजय मुंडे यांना कोण आव्हान देणार असाही प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे पंकजांनी विधान परिषद नव्हे तर विधानसभाच लढवावी, अशाही काहींच्या प्रतिक्रिया येत आहेत.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now