काळजी घे, मी सोबत आहे, दगदग करू नकोस; राजकीय वैर विसरून भावासाठी धावून आल्या पंकजा मुंडे

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि काँग्रेस नेते  धनंजय मुंडे यांची तब्येत अचानक बिघडली आहे. त्यांना ह्रदयविकाराचा सौम्य झटका आल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

धनंजय मुंडे  यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर डॉक्टरांच्या दक्षतेखाली उपचार सुरू आहेत. संध्याकाळच्या सुमारास धनंजय मुंडे यांना अस्वस्थ जाणवू लागलं. त्यांच्या छातीत वेदना होऊ लागल्या. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले.

ही बातमी कळताच अनेक राजकीय नेत्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. तर दुसरीकडे भावाला भेटण्यासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे या देखील सकाळीच रुग्णालयात पोहचल्या आणि धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

‘प्रकृतीची काळजी घे, जास्त दगदग करू नकोस, मी सोबत आहे. बाकी काही होत राहील, पण आधी तब्येत महत्त्वाची आहे, असा सल्ला यावेळी त्यांनी धनंजय मुंडे दिला. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना ह्रदयविकाराचा झटका आला नसल्याचं सांगितलं आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. अजितदादांनी सांगितलं की, “धनंजय मुंडेंना सौम्य झटका आल्याची बातमी पसरली. पण झटका वैगेरे नाही. डॉक्टर पूर्ण तपासणी करत आहेत. डॉक्टरांनी दोन ते तीन दिवस दवाखान्यात ठेवण्यास सांगितलं आहे. त्यांना विश्रांती घेण्यास सांगण्यात आलं आहे”.

तर दुसरीकडे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही ट्विटरवरुन धनंजय मुंडेंची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं आहे. “राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धंनजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कोणतेही कारण नाही. कामाचा ताण व प्रवास इत्यादीमुळे त्यांना अस्वस्थ वाटत होते,” असं टोपे यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या