Share

विनायक मेटे यांच्यासोबतचा किस्सा सांगताना पंकजा मुंडे यांना अश्रू अनावर; म्हणाल्या, ती रुखरुख मनातच राहिली..

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे पुणे मुंबई एक्स्प्रेस वेवर झालेल्या भीषण कार अपघातात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज बीडमधील मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

पंकजा मुंडे म्हणाल्या, सागर बंगल्यावर गेले, तेव्हा विनायक मेटे पाठमोरे उभे होते. मी त्यांच्या पाठीवर टपली मारत म्हटलं, काय मेटेसाहेब? ते म्हणाले, ताई मी भेटायला येतो, पण मला वेळ नसल्याने बोलणं झालंच नाही, अशी रुखरुख यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.

तसेच म्हणाल्या, विनायक मेटे आणि माझा जवळपास २२-२३ वर्षांचा परिचय होता. युवा अवस्थेत असताना त्यांनी मराठवाड्यातील मराठा समाजाच्या युवकांची संघटना स्थापन केली, तेव्हापासून ओळखत होतो. ते मला कार्यक्रमांना आमंत्रण द्यायचे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

म्हणाल्या, विनायक मेटे यांच्यासोबत नेहमी गप्पा असायच्या. राजकारणात एकत्र काम केलं आहे. आमच्या राजकीय भूमिका जरी वेगळ्या असल्या तरीही आमच्यात खूप छान संवाद होता, अशी आठवण पंकजा मुंडे यांनी यावेळी काढली.

दरम्यान, प्रीतम मुंडे यांनी देखील विनायक मेटे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. म्हणाल्या, पहिली लोकसभा पोटनिवडणूक मी लढवली, तेव्हा विधानसभा निवडणूकही होती, त्यावेळी आम्ही एकत्र प्रचार केला होता, तेव्हाच्या अनेक आठवणी आहेत.

विनायक मेटे यांच्या आईने दिलेल्या प्रतिक्रियेकडे सर्वांचे लक्ष गेले. मेटे यांची आई म्हणाली, माझं लेकरु अपघाताने गेलं नाही, माझं लेकरु मराय सारखा नव्हता. जाणून बुजून माझं लेकरु मारलं, त्याची चौकशी करा, माझ्या लेकराला सुरक्षा कशी दिली नाही असे मेटे यांची आई म्हणाली.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now