गेल्या महिन्यातभारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असताना अटक करण्यात आलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याचा मृत्यू झाला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती आहे. जम्मू काश्मीर येथील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते.
हल्लेखोर पकडल्यानंतर लष्कराने दावा केला की, त्याने भारतीय लष्कराला हानी पोहोचवण्यासाठी पाकिस्तानी कर्नलकडून पैसे घेतले होते. या दहशतवाद्याचे नाव तबराक हुसैन असून याने चौकशीदरम्यान कबूल केले होते की, त्याला भारतात आत्मघातकी मोहिमेवर पाठवण्यात आले होते.
खांद्यावर आणि पायाला गोळी लागल्याने जखमी अवस्थेत लष्कराने त्याला अटक केली होती, त्यानंतर त्याच्यावर राजौरी येथील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू होते. घुसखोरीच्या अयशस्वी प्रयत्नादरम्यान २१ ऑगस्ट रोजी नियंत्रण रेषेजवळ झांगेर नौशेरा येथे तबराक जखमी अवस्थेत पकडला गेला. वृत्तानुसार, तो पाकव्याप्त काश्मीरमधील सबजाकोट येथील मिस्त्री मलिकचा मुलगा होता.
या दहशतवाद्याने यापूर्वी सांगितले होते की, तो चार-पाच जणांसह आला होता आणि त्याला भारतीय लष्कराला लक्ष्य करण्यासाठी कर्नल युनूस या पाकिस्तानी कर्नलने ३०,००० रुपये दिले होते. गोळी लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दहशतवाद्याचा जीव वाचवण्यासाठी त्याला रक्तदान केले.
ब्रिगेडियर राजीव नायर म्हणाले होते की, आम्ही त्यांना कधीच दहशतवादी मानले नाही. त्याचा जीव वाचवण्यासाठी आम्ही त्याच्यावर इतर रुग्णांप्रमाणे उपचार केले. हे भारतीय सैन्यातील अधिकाऱ्यांचे मोठेपण आहे ज्यांनी आपले रक्त सांडायला आले असतानाही त्यांना आपले रक्त दिले. त्याचा रक्तगट अत्यंत दुर्मिळ होता, तो होता ‘ए निगेटिव्ह’. परंतु तो वाचला नाही. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला.
तबराक हुसैन हा पाकव्याप्त काश्मीर मधील कोटली येथील सब्जकोट गावातील रहिवासी असून त्याला त्याचे साथीदार पळून गेल्यानंतर नौशेरा सेक्टरमध्ये अटक करण्यात आली होती. भारतीय जवानांनी घुसखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला ज्यात तबराक हुसैन जखमी झाला आणि बाकीचे पळून जाण्यात यशस्वी झाले होते.