शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार विनायक राऊत यांनी ‘शेंडी- जाणव्याचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही’ असं वक्तव्य केलं होतं. त्यावर आता ब्राम्हण समन्वय समितीने आक्षेप घेतला आहे. विनायक राऊत यांनी आठ दिवसात ब्राम्हण समाजाची माफी मागावी अन्यथा ‘मातोश्री’ वर मोर्चा काढू असा इशारा दिला आहे.
औरंगाबाद येथे झालेल्या पत्र परिषदेत विनायक राऊत यांनी फडणवीस यांच्यावर टीका करताना ‘शेंडी जाणव्याचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही असे खळबळजनक वक्तव्य केलं होतं. यावर आता ब्राम्हण समाज समन्वय समितीने समस्त ब्राम्हण समाज आणि हिंदू धर्माचा अपमान झाल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे.
यावर संतप्त ब्राम्हण समाजाने माफी मागण्यास सांगितलं आहे. जर आठ दिवसात माफी मागितली नाही तर ‘ मातोश्री’ वरती मोर्चा काढू,असा इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेला काही प्रश्न देखील केले आहेत. शेंडी-जाणव्याचे हिंदुत्व शिवसेनेला मान्य नाही मग टोपी-बुरख्याचे हिंदुत्व शिवसेनेला मान्य आहे का? असा प्रश्न केला.
तसेच, शेंडी जाणव्याचे हिंदुत्व शिवसेनेला मान्य नाही पण शेंडी जाणव्याचे मतदान शिवसेनेला कसे जमते? शिवसेना अशी दुटप्पी भूमिका कशी काय घेते? असा प्रश्न देखील ब्राम्हण समाज समन्वय समितीने शिवसेनेला विचारला आहे. ब्राम्हण समाजासाठी असं वक्तव्य करणं शिवसेनेची ही पहिली वेळ नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
आता आपल्या वक्तव्याबाबत खासदार विनायक राऊत यांनी संपूर्ण समाजाची विनाविलंब जाहीर माफी मागावी अशी आमची प्राथमिक मागणी आहे, असं म्हटलं आहे. तसेच जर त्यांनी माफी मागितली नाही तर, ब्राम्हण समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल व येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये ब्राम्हण समाज मतदार म्हणून शिवसेना पक्षावर पूर्णपणे बहिष्कार टाकेल’. असा इशारा दिला आहे.
ब्राम्हण समाजाच्या अनेक अंगीकृत संघटना, ब्राम्हण समाजातील अनेक राजकीय नेते शिवसेना पक्षामध्ये वर्षानुवर्षे सक्रिय कार्यरत आहेत. मात्र यापूढे शिवसेना पक्षाला मतदान करताना ब्राम्हण समाजाला विचार करावा लागेल. ब्राम्हण समाजाचा वारंवार अपमान करून आपला नेमका कोणाला खुश करण्याचा हेतू आहे? असा प्रश्न ब्राम्हण समन्वय समितीने केला आहे.