नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीतील रासायनिक कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग तब्बल 9 कंपन्यांना लागली असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झालं आहे.
वेस्ट क्लाय पॉलिकॅब कंपनीला ही आग लागली आहे. ही एक रासायनिक कंपनी असल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या दाखल झाल्या आहेत. कंपनीमध्ये काही कामगार देखील अडकल्याची माहिती मिळत आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहेत.
तसेच ज्या कंपनीत आग लागली आहे त्या कंपनीच्या आजूबाजूच्या कंपन्या खाली करण्यात आल्या असून त्यातील कामगारांना बाहेर काढण्यात आलं आहे. मात्र कंपनीला लागलेली आग अजून आटोक्यात आली नसून भीषण रुप धारण करत असल्याची माहिती मिळत आहे.
वेस्ट क्लाय पॉलिकॅब कंपनीला लागलेली आग ही शेजारी असलेल्या 9 कंपन्यांमध्ये पसरली आहे. अग्निशमन दलाकडून शेजारच्या आणखी काही कंपन्यांना आग लागू नये म्हणून कुलिंग प्रोसेस सुरू करण्यात आलेली आहे. मात्र या घटनेत 9 कंपन्यांना अग्निशमन दल वाचवू शकले नाहीत. त्या कंपन्या जळून खाक झाल्या आहेत.
या दुर्घटनेत जखमी झालेल्यांची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र MIDC फायर ब्रिगेडसहित, ठाणे, नवी मुंबई कल्याण आणि डोंबिवली येथून अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून त्यांच्याकडून आग विझवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. खाजगी कंपन्यांकडून फोम देखील मागवण्यात आले आहेत.
माहितीनुसार, ही आग प्रथम रबर कंपनीला लागली आणि त्यानंतर आगीचा भडका एवढा प्रचंड वाढला की शेजारील कंपन्यांना देखील आग लागली. शेजारी रासायनिक कंपनी असल्याने त्या ठिकाणी लागणारी आग आटोक्यात आणण्यास अडचण आली. आग विझवण्यास अग्निशामक दल सध्या प्रयत्न करत आहेत.