आज सकाळपासून गोवा, मणिपूर, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. पंजाबमधून समोर आलेल्या आकडेवारीचा अभ्यास केल्यास दिसते की, आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये चांगलीच बाजी मारली आहे. कॉंग्रेसने केलेल्या नेतृत्व बदल तसेच शेतकऱ्यांचा भाजपबद्दल असलेला आक्रोश या सगळ्यांचा फायदा आम आदमी पक्षाला झाल्याचे चित्र दिसत आहे.
पंजाबच्या निवडणुकांकडे सर्वांचेच लक्ष होते, कारण गेल्या काही महिन्यात अनेक महत्वाच्या घडामोडी पंजाबमध्ये बघायला मिळाल्या. शेतकऱ्यांचा आक्रोश भाजपवर होताच त्याच सोबत कॉंग्रेसच्या नेतृत्व बदलामुळे देखील तिथल्या जनतेने पर्यायी पक्षाला म्हणजेच आम आदमी पक्षाला कौल दिल्याचे दिसत आहे.
पंजाबमधील एकूण 117 विधानसभा जागांवर अनेक उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. एक्झिट पोलनुसार पंजाबमध्ये आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होणार असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. पंजाब निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, पंजाबमध्ये आम आदमी पार्टी 82 जागांवर आघाडीवर आहे.
सर्व प्रस्थापित राजकीय पक्षांना नाकारून पंजाबने देशासमोर आदर्श ठेवला आहे.
पर्याय उपलब्ध असतात, फक्त डोळे उघडे ठेवावे लागतात.— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) March 10, 2022
अशातच आता पंजाबमधील सुरु असलेल्या मतमोजणीवर मनसे नेते अमेय खोपकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट केले आहे की, सर्व प्रस्थापित राजकीय पक्षांना नाकारून पंजाबने देशासमोर आदर्श ठेवला आहे. पर्याय उपलब्ध असतात, फक्त डोळे उघडे ठेवावे लागतात, असे ते म्हणाले आहेत.
सकाळी 10.30 वाजेपर्यंत समोर आलेल्या मतमोजणीनुसार, सुरुवातीच्या कलांमध्ये अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष हा तब्बल 80 पेक्षा जास्त जागांसह पुढे होते. तर भाजप पाच, काँग्रेस 13 आणि अकाली दलाला 8 जागी आघाडी होती. तर 15 अपक्ष उमेदवार हे आघाडीवर होते. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा आप 88 जागांवर आघाडीवर होती.
अरविंद केजरीवाल यांनी भगवंत मान यांच्या नेतृत्त्वाखाली पंजाबामध्ये निवडणुका लढवल्या होत्या. भगवंत मान हे स्टॅंडअप कॉमेडियन म्हणून सगळ्यांना माहीत आहेत. त्यांच्या राजकीय इन्ट्रीवरुनही बरीच चर्चा रंगली होती. आता पंजाब मध्ये त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून त्यांचे चाहते अधिकच खुश होताना दिसत आहेत.