Share

Uday Samanta : दिड लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला; उदय सामंतांनी ठाकरेंवरच फोडले खापर, म्हणाले यापुढे तरी…

वेदांता फॉक्सकॉन ही कंपनी महाराष्ट्रात गुंतवणूक करणार होती, पण शिंदे आणि फडणवीस सरकार येताच हा प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला. या आरोपाला शिंदे गटाचे नेते उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिउत्तर दिलं आहे.

उदय सामंत म्हणाले, वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याबद्दल कंठशोष करताना महाविकास आघाडी सरकारच्या काळात गुजरातपेक्षा चांगले पॅकेज देण्यात कमी का पडलो, याचे उत्तर आदित्य ठाकरे, जयंत पाटील यांनी आधी द्यावे, अशी मागणी केली. यावेळी ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

आतातरी त्यापेक्षा दुपटीहून अधिक गुंतवणूक असलेल्या रिफायनरीच्या गुंतवणुकीत खोडा घालू नये, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे. सामंत म्हणाले, केवळ काहीच दिवसांपूर्वी राज्यात शिवसेना-भाजपा युतीचे सरकार आले. तेव्हा फॉक्सकॉन वेदांताने सांगितले की, गुजरातने अधिक चांगले पॅकेज दिल्याने आम्ही तेथे गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

आम्ही लगेच त्यांच्याशी संपर्क साधला आणि अधिक चांगले पॅकेज देऊ केले. त्यांनी आमच्याशी चर्चाही केली. भरपूर प्रयत्न करूनही त्यांनी आधीच्या गुजरातच्या निर्णयावर ठाम राहण्याचे ठरवले. आता दोषारोपच करायचा असेल तर मग मविआच्या काळात फॉक्सकॉनला चांगले पॅकेज का देण्यात आले नाही? असा सवाल उदय सामंत यांनी केला.

तसेच म्हणाले, दोन वर्षांपासून ते गुजरातशी वाटाघाटी करीत असताना आधीच्या सरकारने त्यांचे मन का वळविले नाही? अडीच वर्षांच्या मविआच्या काळात कोणती मोठी गुंतवणूक आली? याची उत्तरं त्यांना द्यावी लागतील. प्रकल्प गुजरातला गेल्याचे आम्हालाही दु:ख आहे. पण, निराश असलो तरी खचलो नाही.

आम्ही सेमिकंटक्टर क्षेत्रातील अन्य कंपन्यांशी चर्चा करू आणि त्यांना महाराष्ट्रात आणू. गेल्या अडीच वर्षांपेक्षा अधिक चांगल्या उंचीवर महाराष्ट्राला निश्चितपणे नेऊ, असे सामंत म्हणाले. तसेच म्हणाले, असाच प्रकार गिफ्ट सिटीच्या बाबतीत झाला.

नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी तत्कालिन संपुआ सरकारकडून परवानगी आणली. महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार असूनही त्यांनी परवानगी आणली नाही आणि मग प्रकल्प गुजरातमध्ये गेला की, ओरड सुरू केली. परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र क्रमांक १ वर होता.

गुजरात, कर्नाटक, दिल्ली ही तिन्ही राज्य मिळून जी बेरीज व्हायची, त्यापेक्षा अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात भाजपा-सेना युतीच्या सरकारच्या काळात यायची. आता राज्यात पुन्हा तीच युती मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात कार्यरत आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे किंवा जयंत पाटलांनी फार काळजी करण्याची गरज नाही, असा खोचक टोला उदय सामंत यांनी लगावला.

राज्य राजकारण

Join WhatsApp

Join Now