Share

सरकार कोणत्या निकषांवर चित्रपटांना करमुक्त करते? ‘झुंड’च्या निर्मात्यांचा थेट सवाल

‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट देशात सर्वच ठिकाणी चर्चेचा विषय ठरला आहे. या चित्रपटाने बॉक्सऑफीसवर धुमाकूळ घातला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक नेत्यांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. त्यातच महाराष्ट्र राज्यात हा चित्रपट करमुक्त व्हावा यासाठी मागणी होत होती. यावर आता फक्त ‘द काश्मीर फाईल्स’ च फक्त करमुक्त का ‘झुंड’ का नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात 90 च्या दशकात काश्मीरमधील काश्मिरी पंडित आणि हिंदूंच्या हत्याकांडाची आणि पलायनाची कहाणी सांगण्यात आली आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केलं आहे. चित्रपट हिट ठरला असून बॉक्स ऑफिसवरही त्याने घसघशीत कमाई केली आहे.

भारतीय जनता पक्षाचं सरकार ज्या ज्या राज्यांमध्ये आहे त्या त्या ठिकाणी हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. या चित्रपटामुळे बाकी चित्रपटाच्या कमाईत मोठा फरक पडला आहे. अनेक राज्यात ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट करमुक्त झाला. महाराष्ट्रात देखील हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी होत आहे.

त्यातच, नरेंद्र मोदी यांनी जाहीररीत्या हा चित्रपट पाहण्याचे आवाहन करत चित्रपटाला होत असलेल्या विरोधावर भाष्य केले. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून अग्निहोत्री यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. त्यामुळे या चित्रपटाला अधिक प्रसिद्धी मिळाली. यावर, झुंडच्या निर्मात्या सविता राज हिरेमठ यांनी द काश्मीर फाईल्स करमुक्त केला तर झुंड का नाही ? असा जळजळीत सवाल केला आहे.

हिरेमठ यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ‘ मी ‘द काश्मीर फाइल्स ‘हा चित्रपट पाहिला. या चित्रपटातून काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्यायाचं चित्रण केलं आहे. ते पाहून अस्वस्थ झाले आहे. अशा पद्धतीच्या गोष्टी लोकांसमोर येण्याची गरज आहे. हा सिनेमा काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडतो.

परंतु ‘झुंड’ चित्रपटाची निर्माती म्हणून मला एका गोष्टीबद्दल आश्चर्य वाटतं. कारण द काश्मीर फाईल्स हा चित्रपट करमुक्त केला. परंतु तशी सवलत ‘झुंड’ ला का नाही? ‘झुंड’ देखील तितकाच महत्त्वाचा चित्रपट आहे. मला हे जाणून घ्यायचे आहे की सरकार कोणत्या निकषांवर चित्रपटांना करमुक्त करण्यास निवडते, असा त्यांनी सवाल केला आहे.

सविता यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पुढे नमूद केलं आहे की, ‘झुंड’ चित्रपटातून जो संदेश आम्ही दिला आहे, तो देखील तितकाच महत्त्वाचा आहे. या चित्रपटातून केवळ जाती आणि आर्थिक विषमतेवर भाष्य केलेलं आहे. याशिवाय चित्रपटातून समाजातील खालच्या वर्गातील मुलांनी कशा पद्धतीनं यश मिळवलं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे, असे त्या म्हणाल्या.

इतर

Join WhatsApp

Join Now