महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकारने राज्यातील रेशनकार्ड धारकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आता रेशनकार्ड धारकांची दिवाळी गोड होणार आहे. सरकारच्या निर्णयामुळे रेशनकार्ड धाराकांना केवळ १०० रूपयांमध्ये डाळ, साखर, रवा आणि तेल हे साहित्य दिलं जाणार आहे.
१ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच ७ कोटी लोकांना या निर्णयाचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे. रेशनकार्ड धारकांना रवा, चणाडाळ, साखर व तेल याचे प्रत्येकी एक किलो पॅकेज केवळ शंभर रुपयांत दिले जाणार आहे. अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर ५०० कोटींचा आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे. दिवाळी तोंडावर आल्याने कमी कालावधीत नागरिकांना या वस्तूंचा पुरवठा व्हावा यासाठी अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने प्रचलित निविदा प्रक्रियेला छेद देत यावेळी थेट वायदे बाजारातून या वस्तूंची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली त्यात हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या संचात प्रत्येक रेशनकार्डधारकांना १ किलोच्या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर आणि १ लिटर तेल यांचा समावेश आहे.
तसेच हा संच एक महिन्याच्या कालावधीसाठी देण्यात येऊन त्याचं वितरण इ पास प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. दरम्यान, या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेशनकार्ड वस्तूंचा संच दिवाळीपूर्वी वाटप व्हावा तसेच वाटपाबाबत कुठल्याही तक्रारी येऊ नये याची खबरदारी अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, देशात महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. देशात घरगुती गँसपासून ते जीवनावश्यक वस्तूंपर्यंत अनेक गोष्टी महाग झाल्या आहेत. त्यात दिवाळी तोंडावर आली असताना महागाईचा प्रश्न अधिकच सतावत आहे. मात्र, शिंदे सरकारने ऐन दिवाळीच्या तोंडावर जनतेसाठी हा योग्य निर्णय घेतल्याच्या चर्चा आहेत.