Share

राज्यसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने नितीन नांदगावकरांवर सोपवली मोठी जबाबदारी

सध्या राज्यसभा निवडणूकीच्या निमित्ताने राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी होताना दिसत आहेत. अशातच, दुसरीकडे शिवसेनेने मोठी खेळी खेळली आहे. शिवसेनेकडून डॅशिंग नेते म्हणून ओळखले जाणारे नितीन नांदगावकर यांना पक्षसंघटनेत बढती देण्यात आली आहे. शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नितीन नांदगावकर यांची उपनेतेपदी नियुक्ती केली आहे.

माहितीनुसार, नितीन नांदगावकर यांनी नुकतीच मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी नितीन नांदगावकर यांच्याकडे शिवसेनेच्या उपनेतेपदाची सूत्रे सोपवण्यात आली. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने नांदगावकर यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली आहे.

भाजपच्या कडव्या आव्हानामुळे मुंबई महानगरपालिकेची यंदाची निवडणूक ही शिवसेनेसाठी कधी नव्हे इतकी आव्हानात्मक ठरणार आहे. अशावेळी नितीन नांदगावकर यांच्यासारखा आक्रमक आणि धडाडीचा नेता शिवसेनेची भूमिका मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवू शकतो.

तसेच भाजपच्या नेत्यांना त्यांच्याच आक्रमक भाषेत प्रत्युत्तर देण्याची क्षमताही नितीन नांदगावकर यांच्यामध्ये आहे. याच कारणामुळे महानगरपालिका निवडणूक जवळ येऊन ठेपली असतानाच शिवसेनेने नांदगावकर यांना बढती दिली असल्याचे बोलले जात आहे.

नितीन नांदगावकर यांच्याबद्दल अधिक माहिती म्हणजे, नितीन नांदगावकर हे अगोदर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये होते. मात्र, त्यांनी २०१९ मध्ये हाती शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला होता. तेव्हापासून त्यांच्याकडे पक्षाचे कोणतही पद नव्हते. मात्र, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपसारख्या पक्षाविरोधात लढण्यासाठी शिवसेनेला नांदगावकर यांचा मोठा उपयोग होणार आहे.

त्यांनी कोरोना काळात गोरगरीब लोकांची कामे केली आहेत. परप्रांतीय रिक्षाचालकांना त्यांनी अनेकदा सरळ केले आहे. तसेच, वैद्यकीय उपचाराचे बिल कमी करण्यासाठी डॉक्टरांना केलेली दमबाजी यातून त्यांनी समाजातील गरीब व्यक्तींना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषत ते फेसबुकवर मोठ्या प्रमाणात सक्रीय असतात.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now