आमदार फोडण्यासाठी ५० कोटींची ऑफर दिली’; शिवसेना आमदाराचा खळबळजनक दावा

शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. या बंडखोरीमध्ये ४६ आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झाले आहे.

एकनाथ शिंदेना अनेक आमदारांनी पाठिंबा दिला आहे. यावर आता शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांनी मोठा दावा केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आमदार फोडण्यासाठी ५० कोटींची ऑफर देण्यात आली आहे. एका शिवसेना कार्यकर्त्यासह बोलतानाची त्यांची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे.

आपल्याला ५० कोटींची ऑफर होती, पण आपण ही ऑफर स्वीकारली नाही. मातोश्रीवरच थांबलो असे आमदार उदयसिंग राजपूत यांनी या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटले आहे. त्यात ते ऑफर स्वीकारली नाही, कारण माझी सुखी राहण्याची इच्छा आहे असे देखील म्हणतात.

दरम्यान, शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना चर्चेची दारे खुले ठेवण्यात आली आहे. पण एकनाथ शिंदे शिवसेनेच्या बंडखोर सोबत घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन करणार असल्याचे सांगितले जात आहे. भाजपने आतापर्यंत या प्रकरणावर थेट भाष्य केलेलं नाही.

पण एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीला भाजपचा पाठिंबा आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. एकनाथ शिंदे यांनी ४६ बंडखोर आमदारांना सोबत घेऊन नवा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. विधिमंडळाच्या सभागृहातच एकनाथ शिंदे यांच्या नव्या गटाला मान्यता मिळू शकते.

पण यामध्ये अनके अडचणी येऊ शकतात, अशी माहिती राजकीय तज्ज्ञांनी दिली आहे. शिवसेनेने १२ बंडखोर आमदारांच्या विरोधात आक्रमक पावित्रा घेत त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे. आता पुढे महाराष्ट्रातील राजकारण कोणतं वळण घेईल पाहावं लागेल.