भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री असणारे नारायण राणे यांच्याबद्दल शिवराळ तसेच चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप करत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल व्हावा अशी तक्रार भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे.
भाजप कार्यकर्त्यांनी कुडाळ पोलीस स्थानकात भास्कर जाधव यांच्याविरोधात तक्रार केली आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या तसेच राणेंच्या समर्थकांच्या भावना संतप्त आहेत. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य आणि संवेदनशीलता समजून घेऊन तातडीने या प्रकरणाची दखल घ्यावी असे तक्रारीत म्हटले आहे.
आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आज कुडाळ येथे आमदार वैभव नाईक यांच्यावरील एसीबी कारवाईच्या विरोधात एसीबी कार्यालयावर ठाकरे गटाने मोर्चा काढला होता. या मोर्चाच्या वेळी भाजपा नेत्यांबद्दल जाणीवपूर्वक शिवराळ भाषा वापरून तेढ निर्माण करणारी चिथावणीखोर वक्तव्ये करण्यात आली.
अशी वक्तव्ये शिवसेना नेते करणार याची पूर्वकल्पना आल्याने आपणास कालच आम्ही त्यासंबंधी सूचना लेखी तक्रार अर्जाद्वारे दिलेली होती. तरीही आजच्या मोर्चात भाषणे करताना भाजपा नेत्यांविषयी अत्यंत खालच्या दर्जाची आक्षेपार्ह शिवराळ गलिच्छ भाषा वापरण्यात आलेली आहे, असे तक्रारीत म्हटले.
तसेच तक्रारीत म्हटले की, याबाबतची माहिती पोलिसांना आपल्या यंत्रणेद्वारे, तसेच मीडियावरून मिळाली असेलच. केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांना भास्कर जाधव यांनी व्यासपीठावरून जाहीरपणे शिवीगाळ करत बदनामी करणारी आणि खालच्या दर्जाची अत्यंत आक्षेपार्ह अशी शिवराळ भाषा वापरली आहे.
या घृणास्पद प्रकाराने भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये अतिशय संतापाची लाट निर्माण झाली असून योग्य ती कायदेशीर कारवाई संबंधितांवर पोलिसांकडून होईलच असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीत व्यक्त केला आहे.
तसेच, या प्रकरणाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता जाणून त्वरित आमदार भास्कर जाधव यांच्यावर केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्याबद्दलच्या चिथावणीखोर वक्तव्याबद्दल गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर आता पोलिसांकडून सदर प्रकरणी पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.