समस्तीपूर येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपवर निशाणा साधला. आयुष्यात पुन्हा कधीही भाजपसोबत जाणार नाही, असे विधान त्यांनी यावेळी केलं आहे. त्यांनी केलेल्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
नितीश कुमार म्हणाले, मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधीही त्यांच्यासोबत (भाजप) जाणार नाही. अटलजी, अडवाणीजी, , जोशीजी, यांसारखे भाजपचे भूतकाळातील नेते खऱ्या अर्थाने विश्वास ठेवणारे नेते होते. सध्याचे भाजपचे नेते फक्त बोलतात. काम करण्याशी त्यांचे काही देणेघेणे नाही,असे नितीशकुमार म्हणाले.
तसेच म्हणाले, भाजपचे लोक फालतू बोलतात. त्यांचे नेते चुकीचे वक्तव्य करतात. भाजप केवळ समाजात संघर्ष निर्माण करण्याचे काम करत आहे. त्यांचा देशाच्या विकासाशी काहीही संबंध नाही. भाजपवाल्यांनी केवळ भांडण लावण्याचे काम केले असे नितीश कुमार म्हणाले.
तसेच म्हणाले, बिहारमधील अभियांत्रिकी महाविद्यालय पाटणा ही देशातील सर्वात जुनी संस्था आहे. मी त्याचा विद्यार्थी आहे. १९९८ मध्ये जेव्हा अटलबिहारी वाचपेयी देशाचे पंतप्रधान झाले. त्यावेळी अटलबिहारी वाचपेयी यांनी मला केंद्र सरकारमध्ये मंत्री केले.
त्यावेळी केंद्र सरकारने तीन विभागांची जबाबदारी सोपवली होती. आपण सर्वांनी मिळून देशाच्या प्रगतीसाठी खूप काम केले, पण आज केंद्रात बसलेल्या लोकांना विकासाची कोणतीही चिंता राहिली नाही, असे नितीश कुमार यांनी ठणकावून सांगितले.
दरम्यान, २०१७ पूर्वी नितीश कुमार यांनी मिट्टी मे मिल जाएंगे लेकिन बीजेपी के साथ नही जाएंगे असे वक्तव्य केलं होतं. मात्र, त्यानंतर त्यांनी भाजपशी हातमिळवणी केली होती. त्यानंतर आता पुन्हा त्यांनी आयुष्यात कधीही भाजपसोबत जाणार नसल्याचे वक्तव्य केलं आहे.