Share

आता शालेय अभ्यासक्रमातून टिपू सुलतानही होणार ‘आऊट’, कर्नाटक सरकारचा आणखी एक वादग्रस्त निर्णय

हिजाब वाद आणि हिंदू मंदिरांमध्ये मुस्लिम व्यापार्‍यांवर बंदी घातल्यानंतर आता कर्नाटकात नवा मुद्दा निर्माण झाला आहे. कर्नाटक सरकार आता शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये सुधारणा करणार असून, यामध्ये टिपू सुलतानशी संबंधित धड्यांमध्ये बदल करणार आहे.

रोहित चक्रतीर्थ यांच्या अध्यक्षतेखालील राज्य सरकारच्या पाठ्यपुस्तक पुनरावलोकन समितीचा अहवाल आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. कर्नाटकचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बीसी नागेश म्हणाले की समितीने राज्य पुस्तकांमध्ये, विशेषतः टिपू सुलतानशी संबंधित असलेल्या पुस्तकांमध्ये सुधारणा करण्याची शिफारस केली आहे.

तसेच शिक्षणमंत्री म्हणाले, समितीचा अहवाल मला मिळाला आहे. चर्चेनंतर पुढील शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मात्र, यावेळी त्यांनी प्रक्रियेशी संबंधित फारशी माहिती दिली नाही. मात्र,या मुद्यावर एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, अहवालात 18 व्या शतकातील शासक टिपू सुलतानवरील इतिहासाचे धडे बदलण्याचा प्रस्ताव आहे.

शिक्षण मंत्री बीसी नागेश म्हणाले की, आत्तापर्यंत टिपू सुलतानबद्दल अनेक खोटी माहिती आणि खोटा इतिहास सांगण्यात येत होता. टिपू सुलतानचा खरा इतिहास लोकांना समजावा, यासाठीच शिक्षणात नवीन आणि खरा इतिहासाचा समावेश केला जाणार आहे.

कर्नाटक सरकारच्या या निर्णयाचा विरोध काँग्रेस आमदार प्रियांका खडगे यांनी केला आहे. त्या म्हणाल्या, ICSE आणि CBSE मधील इतिहासाचा अभ्यासक्रम भाजपच्या नरेटीव्हमध्ये बसत नाही. भाजप वाल्यांनी कधीच ऐतिहासिक संघर्ष किंवा स्वतंत्र संग्रामात सहभाग नोंदवला नाही.

त्यांना आता इतिहास बदलून, स्वतःचे नाव इतिहासात लिहायचे आहे. याशिवाय, कर्नाटक सरकारच्या या निर्णयावर काँग्रेस आमदार अजय सिंह यांनी देखील आक्षेप घेतला आहे. म्हणाले, भाजप समाजात फूट पाडून राज्य करण्याचा प्रयत्न करत आहे. आता विरोधकांच्या टिकेनंतर कर्नाटक सरकार आपल्या योजनेत काही बदल करणार का पाहावं लागले.

इतर राजकारण

Join WhatsApp

Join Now