आताच एवढे बावचळलात, विधानपरिषद गुप्त मतदानाने आहे, त्यावेळी काय करणार? शेलारांचा ‘मविआ’ला सवाल

काही दिवसांपासून राज्यसभेच्या निवडणुकीवरून राज्यात अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या. दरम्यान, काल राज्यसभेचा निकाल लागला. या निकालानंतर राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. अशातच भाजप नेते आशिष शेलार यांनी देखील महाविकास आघाडीला काही सवाल करत टोले लगावले आहेत.

राज्यसभेच्या निवडणुकीत उघड पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीचे चित्र समोर आल्यानंतर महाविकास आघाडी बावचाळली. मग येत्या २० जून रोजी विधान परिषदेची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये गुप्त पद्धतीने मतदान होणार आहे. यावेळी महाविकास आघाडी काय करणार असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं शिवसेनाला मदत केली नाही. भाजपकडे ११३ मतांचा कोटा असताना १२३ मत कशी आणि कुठून आली? असा सवाल यावेळी शेलार यांनी केला आहे. शिवसेनेच्या प्रथम पसंतीचे उमेदवार संजय राऊत यांच्यापेक्षा भाजपच्या धनंजय महाडिक यांची मते अधिक असल्याचे देखील म्हणाले.

राज्यसभा निवडणुकीमध्ये सपाची मते ही चालवून घेतली तेव्हा ह्रदयातला राम कुठे काढून ठेवला? आता सांगा कुणाची बी टिम? महाराष्ट्रात संजय पवार हारतो आणि इम्रान प्रतापगढी जिंकतो हा प्रताप आता महाराष्ट्र बघतो आहे. असे आशिष शेलार म्हणाले.

शेलार यांनी ट्विट करून तीन मुद्दे मांडत महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. त्यात लिहिले उघड मतदानात जे चित्र समोर आले त्याने एवढे बावचळलेत मग विधानपरिषद निवडणूक गुप्त मतदानाने, तेव्हा काय करणार?अंतर्विरोधाचा तिन तिघाडा किती दिवस झाकणार? भाजप नेत्यांच्या घरातील तथाकथित अनधिकृत बांधकामे शोधण्यापेक्षा सरकारमधील फूट शोधण्याचा किमान समान कार्यक्रम राबवा असेही आशिष शेलार म्हणाले.

दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. तर भाजपचा तिसरा उमेदवार विजयी झाला आहे. महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे अपक्ष आमदारांनी भाजपला मत दिल्यामुळे ठाकरे सरकारमध्ये असंतोष असल्याचे दिसत आहे, अशी टीका भाजपकडून करण्यात येत आहे.