Tata group : आता टाटा बनवणार आयफोन, भारतीयांना भेटणार टाटा मेड आयफोन; वाचा सविस्तर माहिती

टेक कंपन्यांनी जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या स्मार्टफोन बाजाराबाबत म्हणजेच भारताबाबत त्यांच्या धोरणात बरेच बदल केले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आयफोनचे उत्पादन भारतात होत आहे. मात्र आता लवकरच भारतात तयार झालेले लेटेस्ट आयफोन बाजारात येतील अशी माहिती आहे.

टाटा समूह आणि तैवानच्या विस्ट्रॉन कॉर्प यांच्यात भारतात आयफोन निर्मितीसाठी बोलणी सुरू आहेत. दोन्ही कंपन्या एकत्रितपणे एक संयुक्त उपक्रम स्थापन करू शकतात, जिथे Apple iPhones एकत्र केले जातील. ब्लूमबर्गने शुक्रवारी ही माहिती दिली आहे.

या प्रकरणाशी संबंधित एका व्यक्तीने सांगितले की, हा उपक्रम टाटा समूहाच्या तंत्रज्ञान उत्पादन क्षेत्रात एक नवीन प्रयत्न असेल. भारतात आयफोनची असेंब्ली २०१७ मध्ये सुरू झाली. विस्ट्रॉन आणि फॉक्सकॉन दोन्ही भारतात आयफोन असेंबल करतात.

Apple आता चीन आणि तैवानच्या बाहेर भारतात असेंब्ली युनिट्स बांधत आहे, मात्र टाटा आणि विस्ट्रॉन यांच्यात सुरू असलेल्या चर्चेत Apple सहभाग आहे की नाही हे माहित नाही. ही योजना पूर्ण करण्याचे दोन मार्ग आहेत. एकतर टाटा समूह विस्ट्रॉनच्या इंडिया ऑपरेशनमध्ये इक्विटी खरेदी करू शकतो किंवा दोन्ही कंपन्या संयुक्तपणे नवीन असेंब्ली प्लांट सुरू करू शकतात.

कराराशी संबंधित तपशील अद्याप निश्चित झालेला नाही. Apple, टाटा ग्रुप आणि विस्ट्रॉन यांनी या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मागील काही रिपोर्ट्सनुसार,येत्या दोन-तीन महिन्यांत भारतात ऍपलचे लेटेस्ट फोन्स बाजारात येतील.

दरम्यान, Apple ने आपली iPhone १४ मालिका या आठवड्यातच लॉन्च केली आहे. या मालिकेत कंपनीने चार नवीन स्मार्टफोन iPhone १४, iPhone Plus, iPhone १४ Pro आणि iPhone १४ Pro Max लॉन्च केले आहेत. कंपनीने iPhone १४ सीरीजमध्ये कोणतेही मोठे बदल केलेले नाहीत.

तुम्हाला iPhone १४ Pro सीरिजमध्ये डिझाईन, प्रोसेसर आणि कॅमेराच्या बाबतीत बहुतांश नवीन गोष्टी पाहायला मिळतील. या मालिकेत कंपनीने ४८MP कॅमेरा, A१६ बायोनिक चिपसेट आणि नवीन डिस्प्ले दिला आहे. ७ सप्टेंबर रोजी झालेल्या लॉन्च इव्हेंटमध्ये Apple ने Apple Watch Series ८, SE आणि Watch Ultra हे नवीन iPhones लाँच केले आहेत. याशिवाय कंपनीने Airpods Pro देखील लॉन्च केला आहे, जो नवीन फीचर्ससह येतो. लवकरच ही सर्व उत्पादने बाजारात उपलब्ध होतील.