शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका पत्रकार परिषदेत भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत अनेक गोष्टींचा उलगडा केला होता. या प्रकरणी नील सोमय्या यांना अटक होऊ शकते असे वातावरण झालं आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांनी मुलाला अटकपूर्व जामीना मिळावा यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.
संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन सोमय्यांचा पर्दाफाश केला होता, म्हणाले होते की, निकॉन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कंपनीही किरीट सोमय्या, त्यांचे कुटूंबीय आणि त्यांचा मुलगा नील यांची आहे. यात त्यांचा भागीदार पीएमसी बँक गैरव्यवहारातील आरोपी राकेश वाधवा आहे. पीएमसी गैरव्यवहारातील पैशाची गुंतवणूक त्याने केली,असे गंभीर आरोप संजय राऊत यांनी केले होते.
तसेच, पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणी सोमय्यांनी ब्लॅकमेल करून कोट्यवधीची जमीन देवेंद्र लधाणी या फ्रंटमनच्या नावावर घेतली. चारशे कोटींची जमीन फक्त साडेचार कोटींना घेण्यात आली. एकूण दोन जमिनी घेण्यात आल्या. दुसरी जमीन सात कोटींनी घेण्यात आली. या जमिनीवर जो प्रकल्प उभा आहे, त्या कंपनीचा संचालक नील सोमय्या आहे, असे संजय राऊत यांनी आरोप केले होते.
संजय राऊत यांनी या प्रकरणाची कागदपत्रे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवली होती. याच प्रकरणात नील सोमय्यांना अटक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नील सोमय्या यांनी अटकपूर्व जामिनासाठी आता न्यायालयात धाव घेतली आहे.
नील सोमय्या यांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर आजच सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता न्यायालय नील यांना दिलासा देते की नाही याकडे लक्ष लागले आहे. सध्या मुलाला वाचवण्यासाठी सोमय्या यांची धावपळ होताना दिसत आहे.
दरम्यान, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे, त्यामुळे राजकिय वातावरण तापले आहे. केंद्रीय यंत्रणांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाई केल्यानंतर आता राज्य सरकारही उत्तर देण्याच्या तयारीत असल्याचे समजते. त्यामुळे लवकरच नील यांच्यावर कारवाई होऊ शकते, असे बोलले जात आहे.