पाणी हे जीवन आहे, पाण्याशिवाय माणसाचं पृथ्वीवर आस्तित्त्व नाही. कारण ती मनुष्याची जीवनावश्यक गरज आहे. परंतु जगभरात सर्वच प्रदेशांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे दुष्काळी तथा कमी पर्जन्यमान असलेल्या भागांत पाणी विकत मागवावं लागतं. त्याचमुळे आता पाण्याचं शुद्धीकरण आणि त्यानंतर त्याची चढ्या भावाने होणारी विक्री हा कमी दिवसांत जास्त पैसे कमावून देणारा व्यवसाय म्हणून समोर येत आहे.
त्याचमुळे आता मिनरल पाणी किंवा शुद्ध केलेल्या विक्रीचा व्यवसाय जोरात सुरू झाला आहे. त्यातच आता उन्हाळा सुरू झाल्यामुळे या व्यवसायाला जोर आला आहे. याच व्यवसायात गुंतवणूक करून तुम्ही लखपती किंवा कोट्यधीश होऊ शकता. परंतु त्यासाठी तुम्हाला काही विशेष गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.
सध्या बाजारात एक लिटर शुद्ध पाण्याची किंमत वीस रुपये आहे तर साध्या पाऊचची किंमत ही पाच ते दहा रुपये एवढी आहे. हे पाणी महाग असूनही त्याची मागणी सातत्याने वाढत आहे. त्याचबरोबर उन्हाळ्यात ग्राहकांना शुद्ध आणि थंड पाणी हवे असते, म्हणून ते पाणी विकत घेतात. त्यामुळे त्यातून मोठी कमाई करण्याची संधी उपलब्ध होत आहे.
वॉटर प्लांटसाठी सर्वात आधी एक कंपनी सुरू करावी. कायद्यांतर्गत त्याची नोंदणी करावी, त्यानंतर त्याचा नोंदणी क्रमांक मिळतो. कंपनीचा पँन क्रमांक, GST क्रमांक मिळवून घ्यावा. कारण त्याची नंतर आवश्यकता भासते. त्याचबरोबर या व्यवसायात पाण्याच्या टाक्या आणि अद्ययावत मशीन्स ठेवण्यासाठी 1000 ते 1500 स्क्वेअर फूट जागा असणे आवश्यक आहे.
जागाही अशी निवडा जिथे तुम्हाला कमीत कमी TDS द्यावा लागेल. त्यानंतर प्रशासनाकडून पाणी विकण्याचा परवाना आणि ISI क्रमांक मिळवावा लागेल. त्यानंतर तुम्हाला किती लाख लिटर पाण्याचा प्लांट तयार करायचा आहे, ते ठरवा. आणि त्यानुसार गुंतवणूक करावी. त्याचबरोबर या व्यवसायासाठी तुम्ही बँकांकडे कर्जासाठी अर्ज करू शकता.
या व्यवसायात नियमित ग्राहक असणं फार आवश्यक आहे. त्यात तुमच्या पाण्याची गुणवत्ता, नियोजन आणि वितरणव्यवस्था योग्य असेल तर यातून मोठी कमाई होऊ शकते. त्यात एका जार ची किंमत 25 रुपये असेल तर मासिक 1,12,500 रुपयांची कमाई करू शकता. झालेला खर्च, घसारा आणि मजूरीचा खर्च वजा केल्यास 30 ते 40 हजार रुपयांचा निव्वळ नफा होऊ शकतो.