एकनाथ शिंदे यांनी जे बंड केलं त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील पाच आमदारांचा सहभाग आहे. त्यापैकी एक म्हणजे संजय शिरसाट. सध्या ते आपल्या मतदारसंघात परतले असून, त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. दरम्यान, त्यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
शिरसाट मतदारसंघात परतले त्यामुळे संपर्क कार्यालयासमोर मोठी गर्दी जमली होती. शिरसाट यांनी मोठं शक्तिप्रदर्शन केलं. चिकलठाणा विमानतळापासून ते त्यांच्या कोकणवाडीती संपर्क कार्यालयापर्यंत वाहन रॅली काढण्यात आली. त्यानंतर शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी शिरसाट म्हणाले, लोकांची काम व्हावी, मतदारसंघाचा विकास व्हावा या हेतूनेच आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो होतो. मी मुंबईत असताना इकडे अनेकांना कंठ फुटला, कुणी आम्हाला गद्दार म्हणत होते. त्या सगळ्यांना माझे सांगणे आहे, माझ्या नादाला लागू नका, मी कधी कुणावर टीका केली नाही.
तसेच म्हणाले, काल आलेले भामटे आम्हाला शिवसेना शिकवत असतील तर तुमची चार घर कशी झाली ? आणि तुम्ही किती पक्षाशी एकनिष्ठ आहात ती सगळी अंडीपिल्ली बाहेर काढीन. त्यामुळे एकच सांगतो, माझ्या नादाला लागू नका, असे शिरसाट म्हणाले.
म्हणाले, आज विमानतळापासून येतांना लोकांनी जे प्रेम दिले, ते प्रेमच माझी शक्ती आहे. यापुढेही जनतेच्या सेवेसाठीच काम करणार आहे. मला राजकारण करायचे नाही, पण माझ्या अंगावर कुणी आले तर राजकारण गेले खड्ड्यात तुम्हाला धडा शिकवल्याशिवया राहणार नाही, असा इशारा शिरसाट यांनी दिला.
माहितीनुसार, शिरसाट यांचा हा इशारा, चंद्रकांत खैरे आणि दानवे यांच्यासाठी होता. तसेच म्हणाले, संजय राऊतवर मी टीका केली, तर एका भामट्याने महागाईच्या विरोधात शिवसेनेने काढलेल्या मोर्चातील फोटो टाकून हा घ्या पुरावा असे सांगितले.
अहो, असे पुरावे असतात का? असा सवाल शिरसाट यांनी केला, आणि म्हणाले, माझी पुन्हा एकदा सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, माझ्या नादाला लागू नका, रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची देखील माझी तयारी आहे. शिरसाट यावेळी प्रचंड आक्रमक दिसले.