काल नाशिक येथे लघु उद्योग भारतीच्या वतीने आयोजित इंजिनिअरिंग टॅलेंट सर्च स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थिती होते. यावेळी त्यांनी बोलताना पॉलिटेक्निकच्या शिक्षणासंदर्भात मोठी घोषणा केली.
डिसेंबरअखेरपर्यंत अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांची सर्व पुस्तके मराठीत उपलब्ध होतील, नव्या शैक्षणिक वर्षांपासून पॉलिटेक्निक शिक्षण तसेच तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाची पुस्तके मातृभाषा मराठीतूनच हाेणार असल्याची घाेषणा चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली.
तसेच म्हणाले, अभ्यासक्रमास साह्यभूत अभियांत्रिकीची पुस्तके डिसेंबरअखेरपर्यंत मराठीतून उपलब्ध करून देऊ. यासोबतच डिव्हाइसदेखील विकसित हाेत आहे. शिक्षकांनी इंग्रजीतून शिकवले तरी विद्यार्थ्यांना ते मातृभाषेतून समजणार असल्याने ही पद्धत अधिक सोपी असल्याचे त्यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, दहावीनंतर पॉलिटेक्निक किंवा बारावीनंतर इंजिनियरिंगसाठी प्रवेश घ्यायचा म्हटले की ग्रामीण विद्यार्थ्यांपुढे इंग्रजीचं संकट उभे राहतं. अशात पॉलिटेक्निकची पुस्तके मराठीतून मिळाली तर नक्कीच विद्यार्थ्यांना मदत होईल.
आपल्या भाषेतून समजणं आणि ते प्रत्यक्षात उतरवणे सोपे होईल. त्यामुळे मराठीतून पॉलिटेक्निकच्या शिक्षणाचा विद्यार्थ्यांना फायदा होईल अशी आशा चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच म्हणाले, शिक्षणांबरोबर व्यक्तिमत्त्व विकास देखील झाला पाहिजे. त्यासाठी शिक्षणात स्किल डेव्हलपमेंटचे विषय देखील राज्यातील विद्यापीठांनी घ्यावे अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
देशाच्या आर्थिक परिस्थितीवर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, आर्थिक बाबतीत आपण आता पाचव्या क्रमांकावर आलो आहोत. दीडशे वर्ष राज्य करणाऱ्या इंग्लंडला देखील आता मागे टाकले आहे. आता पाचव्या स्थानावरून पहिल्या तीनमध्ये येण्यासाठी संशोधन आणि विज्ञान क्षेत्रात क्रांती झाली पाहिजे, असे पाटील म्हणाले.