यापुढे पर्सनल अटॅक नको, देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निरोप; वाचा काय आहे प्रकरण

राज्यात विधानपरिषद निवडणुकीसाठी सर्वच पक्षाने कंबर कसली असतानाच आता राजकीय क्षेत्रातून एक सकारात्मक बातमी समोर येत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ‘आता पर्सनल अटॅक नको’ असा निरोप पाठवल्याची माहिती मिळत आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना असा निरोप पाठवून सावध भूमिका घेतल्याचे नेमके कारण काय असू शकते याबद्दल आता राजकीय वर्तुळात चर्चा होत आहेत. हा निरोप पाठवण्यामागे फडणवीस यांचा हेतू सरळ असेल की यामागे काही रणनीती असेल, याबद्दल देखील राजकीय वर्तुळात अंदाज लावले जात आहेत.

राजकीय नेते सतत एकमेंकावर, त्यांच्या घरच्यांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आता एकमेकांवरती वैयक्तिक पातळीवर हल्ले नकोत, असा निरोप उद्धव ठाकरेंना दिला असल्याची माहिती समोर आली आहे.

यामुळेच की काय एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील मतभेदाची उघडपणे चर्चा सुरु झाल्या आहेत. शिवाय दुसरीकडे आमदारांमध्येही नेतृत्त्वाबाबत नाराजी असल्याचं बोललं जात होतं. मात्र, फडणवीस यांनी शिवसेनेच्या अंतर्गत मतभेदाच्या प्रश्नावर फडणवीसांनी बोलणं टाळलं आहे.

आता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना पाठवलेल्या निरोपानंतर ते काय भूमिका घेणार, याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे. कारण आतापर्यंत फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी तसंच नातेवाईकांवर केलेल्या आरोपांचं काय? शिवसेनेच्या नेत्यांना बदनाम केलं त्याचं काय? असा सवाल आता सेना नेत्यांकडून केला जात आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या राजकारणात नाहीत मात्र, तरीदेखील त्या नेहमी सोशल मीडियावर आपलं मत व्यक्त करून विरोधकांवर टीका करतात. अशावेळी विरोधी पक्षांकडून देखील त्याच प्रकारे प्रतिक्रिया येतात. या टीका कधी कधी अतिशय खालच्या पातळीच्या असतात, यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघते.