shivsena : शनिवारी (काल) रात्री उशिरा केंद्रीय निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय दिला. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला असल्याचं बोललं जातं आहे. निवडणूक आयोगाकडून शिवसेनेचे चिन्ह गोठविण्यात आलं आहे.
याचबरोबर शिवसेना हे पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. तसेच शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याची बातमी समोर येताच राजकीय वर्तुळात भूकंप झाला. राज्याच्या राजकारणात वेगाने उलटसुलट चर्चा सुरू झाली. यावर अनेक प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत.
राजकीय विषयांवर रोखठोक वक्तव्य करणारे जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी देखील भाष्य केलं आहे. फेसबुक पोस्ट करतं वागळे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. ‘अपेक्षेप्रमाणे धनुष्यबाण गोठवला.. नावही बदलावं लागणार.. वाघांच्या भांडणात कमळाबाईचं फावलं..!,’ असं वागळे यांनी म्हंटलं आहे.
तसेच याप्रकरणावरती ज्येष्ठ वकील आणि कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी म्हटलं की, “अंधेरी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने तात्पुरत हे चिन्ह गोठावलं आहे.’
‘अर्थात याबाबत अंतिम निर्णय दोन्ही बाजूंचा पूर्ण युक्तीवाद ऐकून निवडणूक आयोग घेईल. मात्र, याविरोधात दोन्ही गटांना सर्वोच्च न्यायालयात जाता येणार असल्याचं निकम यांनी यावेळी बोलताना स्पष्टच सांगितलं आहे. निकम यांच्या प्रमाणेच अनेक जेष्ठ व्यक्तींनी निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.