आज झालेल्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का देणारी घटना घडली. बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आणि उद्धव ठाकरे यांचे बंधू जयदेव ठाकरे यांनी चक्क शिंदे गटाच्या दसऱ्या मेळाव्याला हजेरी लावली.
एवढेच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जयदेव ठाकरे यांना आपल्या बाजूच्या खुर्चीवर बसवले. यावेळी जयदेव यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतूक करत, आपले विचार देखील सर्वांपुढे मांडले. यावेळी त्यांनी केलेल्या विधानाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
जयदेव ठाकरे म्हणाले, एकनाथ माझा आवडीचा.. आता ते मुख्यमंत्री झालेत… म्हणून एकनाथराव म्हणतो, मला बरेच फोन येत होते, की तुम्ही शिंदे गटात गेलात का? पण हा ठाकरे कोणाच्या गोठ्यात बांधला जात नाही. एकनाथ शिंदेंच्या दोन चार भूमिका मला आवडल्या. धडाडीचा माणूस आपल्याला हवाय, त्याच्या प्रेमासाठी आलोय.
‘आपला इतिहास आहे, चिपळ्या वाजवणारा एकनाथ, त्यांना जवळच्यांनी संपवलं. पण यांना (एकनाथ शिंदे) एकटं पाडू नका, एकटा नाथ होऊ देऊ नका, एकनाथ राहू द्या, तुम्हाला विनंती आहे,’ अशी भावनिक साद देखील यावेळी जयदेव ठाकरेंनी घातली.
तसेच म्हणाले, हे सगळं बरखास्त करा, पुन्हा निवडणुका घ्या आणि शिंदे राज्य येऊ द्या, असे आवाहन देखील जयदेव ठाकरे यांनी यावेळी केले. दरम्यान, शिंदे गटाच्या मेळाव्याला स्मिता ठाकरे यांनी देखील हजेरी लावली. स्मिता ठाकरे या जयदेव ठाकरे यांच्या घटस्फोटित पत्नी आहेत.
यावेळी स्मिता ठाकरे म्हणाल्या, बीकेसीच्या मैदानावर शिवसेनेतील अनेक जुने चेहरे पाहून बरं वाटतंय. बाळासाहेबांच्या वेळी ज्या भावना मनात असायच्या, त्यांना उजाळा मिळतोय. आम्ही साहेबांची सगळी भाषणं ऐकायचो, त्यांची भाषणं ऐकून शिवसैनिकांना उत्तेजन मिळायचं.