विवेक अग्निहोत्री यांचा ‘द कश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपट धुमाकूळ घालत असून अनेकजण चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक यांचे कौतुक करत आहेत. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकरनेही प्रमुख भूमिका साकारली आहे. तर सोशल मीडियावर त्याच्या या भूमिकेचे भरभरून कौतुक केले जात आहे.
चिन्मय मांडलेकरने ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात बिट्टा कराटेची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील एका दृश्याचा फोटो त्याने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. तर त्याच्या या पोस्टवर चाहते भरभरून कमेंट करत त्याच्या भूमिकेचे कौतुक करत आहेत.
एका चाहत्याने त्याच्या या भूमिकेचे कौतुक करताना लिहिले की, ‘आज चित्रपट पाहताना चिन्मय सर खूप कौतुक वाटलं तुमचं. गेल्या आठवड्यात ‘पावनखिंड’ पाहताना शिवाजी महाराजांच्या डोळ्यातील करारीपणा, भावूक, करूणा भाव नि आज ‘द काश्मीर फाईल्स’ मधल्या बिट्टाच्या डोळ्यातील क्रौर्य’.
दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, ‘मागच्या आठवड्यात ‘पावनखिंड’ बघितला आणि तुमची महाराजांची प्रतिमा मनात बसली. अभिमान, आदर सर्वकाही वाटायला लागलं. आणि आज काश्मीर फाईल्स बघितला… तर आज तुमच्याबद्दल राग, किळस, तिरस्कार सर्वकाही मनात आलं. एका कामानंतर दुसरं काम बघितल्यावर लगेच प्रेक्षकाच्या मनातील तुमच्या विषयीचे भाव जर बदलतात, तर मला वाटतं यालाच अभिनय म्हणतात. उत्तम काम सर. पुढील कामासाठी खूप खूप शुभेच्छा’.
‘तू एक उत्तमोत्तम कलाकार आहेस हे तू तुझ्या कामातून सिद्ध करतोस, छत्रपती शिवाजी महाराज साकारणे असो किंवा ‘द काश्मीर फाईल्स’ मधला बिट्टा साकारणे असो दोन्ही रूपात तू वेगळाच दिसतो. ज्या खुबीने तू बिट्टा साकारला आहेस असं वाटत आहे की चित्रपटसृष्टीला एक खलनायक सापडला. खूप खूप शुभेच्छा तुला’, असे एका चाहत्याने म्हटले.
दरम्यान, ‘द कश्मीर फाईल्स हा चित्रपट प्रदर्शनापासूनच बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. सिनेमागृहानंतर आता ओटीटीवरही चित्रपट धुमाकूळ घालण्यास सज्ज आहे. लवकरच झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
प्रसिद्ध निर्मात्याने काश्मिर फाईल्ससाठी रिकामे केले थिएटर; म्हणाला, ‘राष्ट्र प्रथम, माझा सिनेमा नंतर’
द कश्मीर फाइल्स: काश्मिरी पंडितांच्या पलायनाला नक्की कोण जबाबदार? काँग्रेस की जगमोहन?
प्रभासचा राधे श्याम चित्रपट पाहिल्यानंतर चाहत्याने घेतला गळफास, धक्कादायक कारण आले समोर