Share

मोठी बातमी! NDA कडून जगदीप धनखड लढणार उपराष्ट्रपतीची निवडणूक; भाजपची घोषणा

शनिवारी सायंकाळी भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीनंतर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पत्रकार परिषद घेऊन जगदीप धनखड यांच्या नावाची घोषणा केली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. (nda decide vice president candidate)

दुपारी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. तसेच धनखड यांनी शुक्रवारी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. जगदीप धनखड यांच्या नावाच्या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत यावर प्रतिक्रिया दिली होती.

शेतकरी पुत्र जगदीप धनखड त्यांच्या नम्रतेसाठी ओळखले जातात. त्यांना राज्यघटनेची जाण आहे. त्यांना विधिमंडळाच्या कामकाजाची पूर्ण माहिती आहे. ते राज्यपाल आहे. शेतकरी, तरुण, महिला आणि वंचितांच्या भल्यासाठी त्यांनी नेहमीच काम केले आहे. ते आमचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहेत याचा आनंद आहे. मला खात्री आहे की राज्यसभेचे अध्यक्ष या नात्याने ते देशाला पुढे नेण्याच्या उद्देशाने सभागृहाच्या कामकाजात मार्गदर्शन करतील, असे ट्विट मोदींनी केले आहे.

एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा झाल्यानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी विद्यमान उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्यासाठी ट्विट केले. व्यंकय्या नायडू यांचे विनोद आणि त्यांचे चातुर्य लक्षात राहील, असे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.

दरम्यान, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार १९ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. २० जुलै रोजी उमेदवारी अर्जांची तपासणी होईल. तर उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना २२ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. देशाचा पुढील उपराष्ट्रपती निवडण्यासाठी ६ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे.

उपाध्यक्ष निवडीसाठी ६ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी मतमोजणीही होणार असून निवडणुकीचे निकालही लागणार आहेत. उपराष्ट्रपतीपदासाठीच्या उमेदवाराच्या नावावर सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही पक्षांचे एकमत झाले तर मतदानाची गरज भासत नाही.

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now