संजय राऊत यांना काल ईडीने अटक केली. त्यांच्या अटकेनंतर शिवसैनिक आक्रमक झाले. अनेक ठिकाणी त्यांनी आंदोलनं केली. राजकीय वर्तुळातून संजय राऊत यांच्या समर्थनार्थ अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यातच आता संजय राऊत यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस देखील मैदानात उतरली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेकडून संजय राऊत यांच्या अटकेच्या निषेधार्थ सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीच्या दक्षिण मुंबईतील कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे यानिमित्ताने ईडीच्या कार्यालयाबाहेरील वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, ईडीने ही शक्यता लक्षात घेऊन कालपासूनच कार्यालयाच्या परिसरात बॅरिकेडस लावून नाकांबदी केली होती. तसेच आता ईडी कार्यालयाच्या आसपास सीआरपीएफच्या जवानांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
संजय राऊत यांच्यावर नेहमीच ते शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळचे असल्याच्या आरोप होतो. त्यामुळेच की काय राष्ट्रवादी काँग्रेसने संजय राऊत यांच्यापाठी आपली ताकद उभी केली अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे.
तसेच, यापूर्वीही संजय राऊत यांच्याशी संबंधित मालमत्तांवर ईडीने छापे टाकले होते तेव्हाही शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे चिंता व्यक्त केली होती. पवार यांनी संजय राऊत यांच्याविरुद्ध ईडीने केलेल्या कारवाईबाबत काही मुद्दे पंतप्रधानांसमोर ठेवले होते.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे दोन नेते तुरुंगात असताना शरद पवार यांनी पंतप्रधान यांच्यासमोर केवळ राऊतांचा मुद्दा मांडला होता. तेव्हादेखील शरद पवार आणि संजय राऊत यांच्यातील विशेष सख्याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती.