“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घेरण्यासाठी राष्ट्रवादीचे नेतृत्वच मनसेचा वापर करत आहे”

मनसे नेते राज ठाकरे यांना मशिदीवरील भोंगे उतरविण्यास महाविकास आघाडीने नकार दिला आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार करणाऱ्या राणा दांपत्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे राज्यातील स्थिती लक्षात घेत भाजप नेते आशिष शेलार यांनी लोकसत्ताच्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ कार्यक्रमात आपले वेगळेच मत नोंदविले आहे.

आशिष शेलार यांनी “मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर डोळा ठेवूनच शिवसेनेला घेरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मनसेचा वापर करून घेत असावी” अशी गुगली कार्यक्रमात टाकली आहे. त्यांनी म्हणले आहे की, “हनुमान चालीसा हा भाजपचा कार्यक्रम नाही. पण हनुमान चालीसाच्या पठणाला कोणी रोखत असेल, तर त्याला भाजपचा विरोध असेल. भाजप हा हिंदूत्वाच्या विचारांचा पक्ष आहे. हिंदूत्व हे राष्ट्रीयत्व ही आमची भूमिका आहे. कोणत्याही जाती धर्मावर सक्ती केली जात नाही.”

तसेच, “तसेच विशिष्ट धर्माचे लांगूलचालन भाजपला अभिप्रेत नाही. राम मंदिर, रामसेतू, ३७० कलम रद्द करणे, नागरिकत्व सुधारणा कायदा आदी प्रमुख मुद्दय़ांवर भाजपने नेहमीच स्पष्ट भूमिका घेतली आहे. भूमिका मांडण्यासाठी आम्हाला कोणालाही पुढे करण्याची आवश्यकता नाही” अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.

त्यासोबतच, “मनसेच्या सर्व सभांना सर्वत्र परवानगी दिली जाते. मनसेबाबात वेगळी चर्चा कानावर येते. बहुधा राष्ट्रवादीचेच नेतृत्व मनसेचा वापर करून घेत असावे. मनसेला पुढे करून राष्ट्रवादी शिवसेनेची अडचण करीत असण्याची शक्यता नाकारता येत नाही” असा अंदाज शेलारांनी व्यक्त केला आहे. तर, भाजप मनसेच्या मागून आपला कार्यक्रम राबवित असल्याचा आरोप शेलारांनी फेटाळून लावला आहे.

इतकेच नव्हे तर, “शिवसेनाच काय, काँग्रेस, राष्ट्रवादी या कुणाबरोबरही भाजपचे शत्रूत्व नाही. हे सारे आमचे राजकीय विरोधक आहेत. शिवसेनेच्या विश्वासघातकी कार्यपद्धतीमुळेच आमच्यात वितुष्ट निर्माण झाले. युतीचा फायदा दोघांनाही झाली. युतीतूनच शिवसेनेचा विस्तार होत गेला. शिवसेनेचा विस्तार भाजपमुळेच अधिक झाला” असा दावा शेलारांनी केला आहे.

पुढे आगामी निवडणुकांबाबत बोलताना, “महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे एकत्र लढले तरी आगामी निवडणुकांमध्ये चित्र वेगळे असेल. राज्यात तर भाजप स्वबळावर सत्तेत येईल. मोदी यांना मानणारा वर्ग आणि विरोधी वर्ग अशी लढाईत राज्यातील जनता ही मोदींनाच समर्थन देईल” असा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या
…तर भारतात श्रीलंकेसारखी परिस्थीती ओढवेल, याचं भानं केंद्राने ठेवावं; रोहीत पवारांचा घणाघात
‘महाराजांच्या सिनेमांना प्राईम शो मिळवण्यासाठी झगडावं लागतं’; चिन्मय मांडलेकरांनी व्यक्त केली खंत
महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’ – राज ठाकरे
थरकाप उडवणारे दृश्य! तरुण रक्तबंबाळ अवस्थेत मदत मागत होता, मात्र लोक व्हिडीओ काढण्यात व्यस्त होते..