विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एकनाथ खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे भाजपकडून पाच उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. यावेळी भाजपकडून विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे(Pankja Munde) यांना डावलण्यात आलं आहे. यावरून भाजपला सोडचिट्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलेले एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. (NCP eknath khadse criticize BJP)
“कुणीही नवखे आले की पक्ष त्यांना उमेदवारी देतो. पंकजा मुंडे यांना विधान परिषदेसाठी संधी न देणं खरोखरचं दुर्देवी आहे”, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपवर टीका केली आहे. विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी एकनाथ खडसे यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे म्हणाले की, “मुंडे आणि महाजन या दोन्ही परिवारांनी आपले आयुष्य भाजपासाठी खर्ची घातले आहे. त्यांनी पक्षाला मोठं केलं आहे. पण त्यांच्या कुटुंबियांना अशी वागणूक दिली जात आहे. विरोधी पक्षनेते खूप अनुभवी आहेत. म्हणून त्यांनी त्यानुसार निर्णय घेतला आहे”, अशी खोचक टीका एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, “गेली ४० वर्षे मी राजकारणामध्ये आहे. भाजप आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस असा माझा प्रवास झाला आहे. माझे राजकीय जीवन अडचणीत असताना शरद पवार आणि अजित पवार यांनी मला मदत केली. त्यांनी मला आधार दिला. माझ्यावर त्यांनी विश्वास दाखवला. त्याबद्दल मी त्यांचा ऋणी राहीन”, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले आहे.
सध्या घोडेबाजाराला प्राधान्य देऊन राजकारण केले जात आहे, असे देखील एकनाथ खडसे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी एकनाथ खडसेंची पत्नी मंदा खडसे यांनी त्यांचे औक्षण केले. यावेळी एकनाथ खडसे यांचे कुटुंबीय देखील उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेच्या दुसऱ्या जागेसाठी रामराजे नाईक निंबाळकर यांना संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संधी मिळाल्यामुळे एकनाथ खडसे लवकरच विधिमंडळ सभागृहात दिसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे सभागृहात खडसे विरुद्ध भाजप असा जोरदार सामना रंगणार, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे.
महत्वाच्या बातम्या :-
२४ किमी शाळेत सायकलने जायचा, कधी पाॅकेटमनी दिला नाही; आई-वडीलांनी सांगीतलं सिद्धूचं बालपण
नुपूर शर्मा यांची जीभ कापून आणणाऱ्याला…; भीम आर्मीने केली मोठी घोषणा
फोडाफोडीला सुरवात! भाजपच्या महाडिकांनी केला मोठा गेम, शिवसेना आमदारांना ठेवलेल्या हॉटेलात जात..